नागपूर : लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास कारमध्ये झालेल्या स्फोटानंतर राजधानीसह संपूर्ण देश हादरून गेला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर यंत्रणांची सूत्रे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे म्हणजेच ‘एनआयए’कडे सोपवली.त्या यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या आयपीएसच्या तपास पथकाचे अधिकारी विजय साखरे मराठमोळे असून त्यांचे नागपूरशी विशेष नाते आहे. ‘एनआए’च्या तपासाचे धागेदोरे शोधणाऱ्या पथकात १० उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्या पथकाचे नेतृत्व साखरे करत आहेत. साखरे हे सध्या एनआयएचे अतिरिक्त महासंचालक आहेत.
साखरे यांचे नागपूरशी नाते काय?
नागरी सेवेत रुजू झालेले विजय साखरे हे १९९६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांना केरळ कॅडरमध्ये नियुक्त करण्यात आले. ते मूळचे नागपूरचे आहेत. त्यांनी १९८९ ते १९९२ या कालावधीत नागपूरमधील व्हीएनआयटीमधून (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) बीई पूर्ण केले. त्यानंतर साखरे यांनी १९९२ ते १९९३ दरम्यान आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतले. पुढे त्यांनी अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर ते आयपीएस बनले.
‘एनआयएम’ध्ये नियुक्ती
साखरे हे २००० ते २००४ या कालावधीत केरळमध्ये पोलीस अधीक्षक बनले. त्यानंतर पदोन्नती वर कोचीचे पोलीस आयुक्त झाले. तीन वर्षांपूर्वी त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेचे ‘आयजी’ म्हणून नियुक्ती झाली. ८ सप्टेंबर २००२५ ला केंद्र सरकारने त्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणेचे अतिरिक्त महासंचालक (एडीजी) म्हणून नियुक्ती केली.
पथकाचे नेतृत्वही मराठमोळे
दिल्लीतील कारस्फोटाचा तपास ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला. पथकाचे प्रमुख सदानंद दाते आहेत. ते महाराष्ट्रातून दिल्लीला गेले आहेत. बुधवारी दाते यांची केंद्र सरकारने दिल्ली बॉम्बस्फोट चौकशी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली. दाते यांच्या पथकात विजय साखरे यांच्या नेतृत्वाखाली दोन डीआयजी, तीन एसपी आणि इतर डीएसपी दर्जाचे अधिकारी काम करत आहेत. जे नियमितपणे ‘एनआयए’ प्रमुखांना दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या तपासाचे स्टेटस रिपोर्ट देतील.
