नागपूर : नवी मुंबईचे डोंगर पोखरून झाले. आता राज्यातील जंगल पोखरले जात आहेत. जंगलच राहिले नाही तर वनमंत्री काय कामाचे ? वनाधिकाऱ्यांची गरज काय? अशी बोचरी टीका शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी केली होती. आता त्यांनी वनमंत्र्यांच्या खात्यावर घाव घातला आहे.

वनविभाग एकीकडे झाडे लावायला सांगतो आहे, पण जिथे सर्वाधिक हरित क्षेत्र आहे, तिथल्याच झाडांवर वनविभाग कुऱ्हाड चालवत आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. झाडे तोडल्यामुळे जंगल रीकामी झाली आहेत. त्यामुळे जंगलातले प्राणी शहरात यायला लागले आहेत. त्यामुळे माणूस आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष व्हायला लागले आहेत. इथे माणसांचे जीव जायला लागले आहेत, पाळीव जनावरांचे जीव जायला लागले आहेत. शेतकऱ्यांनी शेती करायचे सोडून दिले आहे. मुळातच वनखात्यात जे अधिकारी भरले आहेत ते अधिकांश अधिकारी अमराठी आहेत. रेड्डी, अय्यर अशांचाच भरणा अधिक आहे.

माझा भाषेवर आक्षेप नाही, पण तक्रार करायची असेल तर या अधिकाऱ्यांना भाषा कळत नाही. मराठी नीट समजून घेता येत नाही. तक्रारी देऊनही उपाययोजना होत नाही. मग तक्रारी किती करायच्या. खरोखरच वानखात्याचा टांगा पलटी झाला असे मला जाणवत आहे, असे अधिवेशनादरम्यान निलेश राणे म्हणाले. सगळीकडे बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. वनविभाग नेमका करतो तरी काय हाच प्रश्न मला पडला आहे. गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात वनमंत्री गणेश नाईक यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत मोर्चा उघडला असताना निलेश राणे यांनी गणेश नाईक यांच्याविरोधात टीकास्त्र उघडले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर सोशल मीडियावरून जोरदार टीका करत वनखात्याची कारभाराची कुंडली मांडली. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी वनविभागाच्या कामकाजावर आणि थेट गणेश नाईक यांच्या भूमिकेवर निशाणा साधला आहे. वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? असा हल्लाबोल निलेश राणे यांनी केला.

वनमंत्री हे टीआरपी मिळवण्याच्या प्रयत्नात व्यग्र असल्याची टीका त्यांनी केली. वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण, ग्रामीण भागातील समस्या आणि विकासकामे या मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात गणेश नाईक यांनी मोर्चा खोलला असून भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. असेच होत राहिल्यास एक दिवस तुरुंगात जावं लागेल, असा इशाराचा दिला आहे. हे सुरु असतानाच आता निलेश राणे नाईक विरुद्ध शिंदे वादात उडी घेतली आहे.