scorecardresearch

नागपुरात ‘निर्भया पथक’ दूरचच ; महिला अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेच

उपराजधानीत युवतींसह महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अनिल कांबळे

नागपूर : उपराजधानीत युवतींसह महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महिला संरक्षण आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या धर्तीवर उपराजधानीतही निर्भया पथकाची गरज आहे. परंतु, नागपूर पोलीस दलात अद्याप निर्भया पथक स्थापनच झालेले नाही. गेल्या तीन वर्षांची आकडेवारी लक्षात घेतल्यास शहरात ५७० महिला-मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. तीन वर्षांत ९३१ मुली-तरुणींची छेडछाड, अश्लील चाळे, विनयभंग केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच ९९७ पेक्षा जास्त अल्पवयीन मुली बेपत्ता किंवा त्यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे शहरातील महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्भया पथकाची स्थापना अत्यंत आवश्यक आहे. राज्यात निर्भया पथकाची स्थापना मुंबई पोलिसांनी केली होती. तोच पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्याचे आदेश महासंचालकांनी दिले होते. मात्र, अद्याप नागपुरात असे पथक स्थापन झालेले नाही.

‘निर्भया तक्रार पेटी’ची संकल्पना

मुंबई पोलिसांनी शहरातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय व मुलींच्या वसतिगृहात किंवा खासगी कार्यालयात तक्रारीसाठी ‘निर्भया तक्रार पेटी’ ठेवली आहे. तसेच शहरातील सार्वजनिक उद्याने, तलाव, विरूंगळा केंद्र अशा ठिकाणीसुद्धा तक्रार पेटी आहे.

पथकाची रचना

निर्भया पथकात सहायक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक दर्जाची एक महिला अधिकारी असते. त्यांना मदत करण्यासाठी दोन महिला आणि दोन पुरुष हवालदार असतात. पथकाला विशेष वाहन असते. संपूर्ण शहरात कुठेही कारवाई करण्याचा या पथकाला अधिकार असतो. निर्भया पथक खासगी वेशात वावरते.

काम काय?

निर्भया पथक प्रोअ‍ॅसक्टीव्ह म्हणजेच तक्रारीऐवजी स्वत:हून दखल घेत कारवाई करते. तसेच रिअ‍ॅक्टीव्ह म्हणजेच तक्रारींवर आधारित कारवाई करते. शहरात कुठेही महिलांची छेडखानी करणाऱ्यांवर निर्भया पथकाची नजर असते. १०३ क्रमांक डायल केल्यास लगेच निर्भया पथकाची मदत मिळते.

सध्या नागपूर पोलिसांकडे निर्भया पथक स्थापन झाले नाही. मात्र, पथक स्थापनेसंदर्भात वेगाने हालचाली सुरू आहेत. सध्या नागपुरात दामिनी पथक कार्यरत असून निर्भया पथकाप्रमाणेच महिला सुरक्षेसाठी ते तैनात करण्यात आले आहे.

– चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nirbhaya pathak far away violence against women increasing ysh

ताज्या बातम्या