वर्धा : खदखदफेम नीतेश कराळे उर्फ कराळे मास्तर म्हणून सुपरिचित कराळे हे बेधडक, बेफाम व हातचे नं राखून बोलणारे म्हणून प्रसिद्ध आहे. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे ते प्रदेश प्रवक्ता आहेत. विविध राजकीय कार्यक्रमात त्यांना मजेदार भाषणासाठी आवर्जून बोलावले जाते तसेच विविध घटनावार ते करीत असलेले भाष्य चांगलेच चर्चेत येते. आताही तसेच झाले आहे. नाशिकचा कुंभमेळा विविध कारणांनी गाजत आहे. त्यात वृक्ष तोड तसेच अवाढव्य होणारा खर्च पण चर्चेत आहे.
हा मोठ्ठा खर्च कराळे मास्तर यांच्या नजरेत आला आणि त्यांनी बाण सोडले. ते म्हणाले की हा २५ हजार कोटी रुपयाचा खर्च फालतू आहे. कोणासाठी तर गांजा फुकणाऱ्या साधूसाठी. हे काय शिकवण देणार. आम्ही गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, संत चोखा मेळा, तुकाराम महाराज अशा प्रबोधन करणाऱ्या संतास मानतो.
कुंभमेळ्यात मात्र गांजा फुंकणारे साधू येत आहे. संत नाही. त्यांच्यावर खर्च कशासाठी. जर कोणी म्हणत असेल तर साधू गांजा पिणारे नाही, तर आपण १० लाख रुपयाची शर्त लावायला तयार आहे. अन्यथा सरकारने राजीनामा द्यावा. गांजा पिणारे साधू दाखवून देणार, अशी भूमिका कराळे मास्तर यांनी मांडली आहे.
मात्र कराळे यांचे हे विधान धार्मिक भावना दुखावणारे आहेत. असा आक्षेप घेत विश्व हिंदू परिषदेने वर्धा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. हा अजामीनपत्र गुन्हा आहे. केव्हाही अटक होवू शकते. यावर बोलतांना कराळे म्हणाले की मी कोणाला घाबरत नाही. चुकीचे काही बोललो नाही. म्हटले की अटक करायची असेल तर करा. साधू गांजा पिणारे, असे म्हटले तर धार्मिक भावना कशा दुखावतात ते समजत नाही. मी असे म्हटले की एव्हढा नाहक खर्च या लोकांवर खर्च करू नये. त्यातील किमान २ हजार कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या शाळांवर खर्च केले तर अधिक उपयुक्त ठरतील. ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा सुधारतील. गरीब मुलांना दिलासा मिळेल. यात काय चुकले, ते सांगा. असा सवाल कराळे करतात.
कुंभमेळ्यासाठी मोठी वृक्ष तोड होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर भाष्य करतांना कराळे मास्तर म्हणतात, झाडे तोडण्याची काहीच गरज नाही. यापूर्वी पण नाशिक येथे कुंभमेळे भरले होते. तेव्हा झाडे नं तोडता मेळे झालेच. आताच काय गरज पडली. तर हा कट आहे. कुंभ मेळ्याच्या नावाखाली झाडे तोडून ती जागा मोकळी करून घ्यायची व नंतर लाडक्या उद्योगपतीस आंदन द्यायची, असा बेत असल्याचा आरोप कराळे करतात. दीडशे वर्ष जुनी झाडे तोडणार आणि लोकांनी गप्प बसावे, हे चालणार नाही, असा ईशारा पण कराळे मास्तर यांनी दिला आहे.
