नागपूर: भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेला व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारित केल्याच्या आरोपावरून नितेश कराळे यांच्याविरोधात वर्धा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गोपनीय शाखेतील कर्मचाऱ्याने समाजमाध्यमावरील निरीक्षणादरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तक्रार केली. याशिवाय कराळे मास्तर यांनी कुंभमेळा आणि आरक्षण हटाव मोहिमेविरोधात व्हिडिओ बनवून अक्षय पर्यवक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांना वर्धा पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. नितेश कराळे मास्तरांनी आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या खर्चावर प्रश्न उपस्थित करत, कुंभमेळ्यासाठी होणारा तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा खर्च हा अनावश्यक असल्याचे म्हटले होते. तसेच कुंभमेळ्यात येणारे साधू गांजा सेवन करण्यासाठी येतात, असा कथित आक्षेपार्ह उल्लेख त्यांनी केला होता. या वक्तव्यावरून विश्व हिंदू परिषदेसह हिंदू संघटनांनी आक्षेप घेत पोलिसांत तक्रार दाखल केली होती.”

हा वाद होता चर्चेत

नितेश कराळे मास्तर यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे निर्माण झालेला वाद आता पुन्हा चर्चेत आला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू-संतांबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे यापूर्वीच त्यांच्या विरोधात तक्रार व अजामीनपात्र गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त समोर आले होते. या प्रकरणामुळे त्यांच्यावर मोठी टीका झाली होती.
दरम्यान, ३१ जुलै २०२६ रोजी ‘आरक्षण हटाव’ या विषयावर सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या व्हिडिओतील कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून कराळे मास्तरांविरोधात पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात तक्रार झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

याच प्रकरणात २७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे पोलिसांनी नितेश कराळे मास्तरांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर अटक केली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे आता राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर अशा तिन्ही अंगांनी पाहिले जात आहे.

नितेश कराळेंविरोधात गुन्हा का दाखल झाला?

त्यांच्या समाजमाध्यम खात्यावर भारतीय न्यायव्यवस्थेबद्दल टीका करणारा आणि आक्षेपार्ह स्वरूपाचा व्हिडीओ प्रसारित केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या वक्तव्यांमुळे न्यायव्यवस्थेबद्दल समाजात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत पोलीस हवालदार प्रदीप नागोराव सहकाटे हे समाजमाध्यम निरीक्षणाचे काम करीत असताना १६ ऑगस्ट रोजी त्यांना हा व्हिडीओ आढळला. व्हिडीओ पूर्ण पाहिल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या निदर्शनास ही बाब आणून तक्रार दाखल केली होती.