नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत २४ हजारांहून अधिक मते मिळवून राजकीय ताकद दाखवून देणारे नितेश कराळे आगामी काळात स्वतंत्र राजकीय वाटचाल करण्याच्या तयारीत आहेत. नवा पक्ष स्थापन करायचा की नाही, याचा निर्णय दिवाळीदरम्यान घेण्यात येणार असून, त्यापूर्वी सहा जिल्ह्यांचा दौरा करून जनतेची मते जाणून घेणार असल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्यांच्या पक्षाला माझा फायदा झाला; मात्र मला राष्ट्रवादीकडून वैयक्तिक पातळीवर काहीही मिळाले नाही,’ अशी भूमिका त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मांडली.
पदवीधर निवडणुकीतील मतदानानंतर कराळे यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आणि पुढील वाटचाल याबाबत चर्चा सुरू झाली आहे. विविध जिल्ह्यांतील नागरिक आपल्या समस्या घेऊन त्यांची भेट घेत असल्याने या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र राजकीय भूमिका घेण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. त्यामुळे आगामी काळात कराळे कोणती भूमिका घेतात आणि त्याचा विदर्भातील राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे लक्ष लागले आहे.
सहा जिल्ह्यांचा दौरा करून निर्णय
नवा राजकीय पक्ष स्थापन करण्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. यासंदर्भात घाईने निर्णय घेण्याऐवजी सहा जिल्ह्यांचा दौरा करून लोकांशी संवाद साधण्याचा कराळे यांचा विचार आहे. या दौऱ्यात नागरिकांची मते आणि अपेक्षा जाणून घेतल्यानंतरच पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाईल, असे त्यांनी सांगितले. त्यामुळे स्वतंत्र पक्ष स्थापन करणे, अन्य राजकीय पर्यायांचा विचार करणे किंवा वेगळी भूमिका घेणे, याबाबतचा निर्णय जनतेच्या प्रतिसादानंतर स्पष्ट होणार आहे.
शरद पवारांशी वैयक्तिक संबंध
शरद पवार यांच्याशी आपले वैयक्तिक संबंध असल्याचे सांगतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्णपणे प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असेही कराळे यांनी स्पष्ट केले. वर्धा येथे आपण मोठी अकादमी उभारत असून, तिच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांनी उपस्थित राहावे, अशी आपली इच्छा आहे. यापूर्वीही त्यांना यासंदर्भात विनंती केली असून, त्यांनी उद्घाटनाला येण्याचे आश्वासन दिल्याचे कराळे यांनी सांगितले.
अकादमीच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्यासाठी आपण पवार यांची भेट घेणार आहोत. मात्र, या भेटीचा अर्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याशी जोडू नये, असेही त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते.
पदवीधर निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या जोरावर कराळे आता स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत का, याबाबत उत्सुकता आहे. सहा जिल्ह्यांच्या दौऱ्यानंतर ते कोणता निर्णय घेतात, यावर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचे स्वरूप अवलंबून असेल.
कराळे मास्तरांची राष्ट्रवादीतून ६ वर्षांसाठी हकालपट्टी
पक्ष शिस्तीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नितेश कराळे गुरुजी यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर निवडणुकीत पक्षाच्या निर्णयाचा विरोधात जाऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरणे आणि आपल्याला शरद पवारांचा आशीर्वाद निवडणुकीत असल्याचा संभ्रम निर्माण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. पक्षाचे सरचिटणीस रविंद्र पवार यांच्या सहीचे कारवाई करणारे पत्र दिले होते. नितेश कराळे गुरुजी सोशल मीडियात वादग्रस्त वक्तव्य आणि आपल्या शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे प्रसिद्ध आहेत.
