नागपूर: नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघात नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवार असतानाही २४ हजारांहून अधिक मतदान घेतले. त्यामुळे त्यांची लोकप्रियताही वाढली आहे. यानंतर कराळे यांनी आता सरकारविरोधात एका विषयावरून बंड पुकारले आहे. रामटेक येथे प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटरसाठी ५० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नितेश कराळे यांनी केली आहे. रामटेकमधील या केंद्रासाठी जागेची मागणी करणाऱ्या युथ वेल्फेअर असो.चे पदाधिकारी भेटायला आल्यानंतर कराळे यांनी यासंदर्भात चित्रफीत तयार करून आपली भूमिका मांडली. चित्रपट नगरीसाठी १५० एकर जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असेल, तर त्यापैकी ५० एकर जागा आंबेडकर नॉलेज सेंटरसाठी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जागा न मिळाल्यास नागपूरच्या संविधान चौकात किंवा देवगिरी निवासस्थानासमोर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

कसा राहणार आहे नॉलेज सेंटर

 रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटरमध्ये अभ्यासिका, कौशल्य विकास केंद्र आणि युवक कल्याणाशी संबंधित उपक्रम राबवण्याचे नियोजन आहे. या केंद्राचा लाभ बहुजन समाजातील सर्व जातींच्या विद्यार्थ्यांना आणि युवकांना मिळणार असल्याचे कराळे यांनी चित्रफितीत नमूद केले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सुविधा आणि युवकांना कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या केंद्रासाठी जागा मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या जागेसाठी यापूर्वीपासून मागणी केली जात असल्याचा दावा करीत कराळे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. उपविभागीय अधिकाऱ्यांनी जागा देण्यास अनुकूलता दर्शवल्याचे सांगण्यात येत असताना, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विषयावर संपर्क केला असता प्रतिसाद दिला नसल्याने नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री या नात्याने बावनकुळे यांनी या विषयात लक्ष घालून जागेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

चित्रपट नगरीच्या जागेतून ५० एकर देण्याची मागणी

रामटेक येथे प्रस्तावित चित्रपट नगरीसाठी १५० एकर जागा देण्याचे नियोजन असल्याचा संदर्भ देत, त्यापैकी ५० एकर जागा आंबेडकर नॉलेज सेंटरसाठी राखून ठेवण्याची मागणी कराळे यांनी केली. चित्रपट नगरीच्या प्रकल्पाला विरोध नसून, त्याआधीपासून मागणी होत असलेल्या नॉलेज सेंटरचाही शासनाने विचार करावा, अशी त्यांची भूमिका आहे. दोन्ही प्रकल्पांसाठी जागेच्या उपलब्धतेचा विचार करताना नॉलेज सेंटरच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये, असे त्यांनी म्हटले.

खासदारांसह मंत्र्यांनी लक्ष घालावे

खासदार श्यामकुमार बर्वे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, तसेच राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुढाकार घेऊन नॉलेज सेंटरसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कराळे यांनी केले. या मागणीला काँग्रेसच्या नेत्यांनीही सहकार्य करावे, असे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली नाही, तर महायुतीला मतदान करणार नसल्याची भूमिकाही कराळे यांनी मांडली. जागेचा प्रश्न मार्गी न लागल्यास संविधान चौकात किंवा देवगिरी निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.