नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब आणि अजीत पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास दबाव टाकला होता. यास मी नकार दिल्याने मला तुरुंगात जावे लागल्याचा आरोप अनेकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. शिवसेना (ठाकरेगट) नेते संजय राऊत यांनी देखील याचा मुद्यावरून भाजपला लक्ष्य केले होते. आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी देशमुख आणि राऊत यांचे जेवण करतानाचे एक छायाचित्र ट्विट करीत तेथे असलेली व्यक्ती कुख्यात गुंडाची साथीदार असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पुन्हा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

संजय राऊत रविवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवत विदर्भातील नेते विदर्भाला न्याय द्यायला सपशेल अपयशी ठरल्याची टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण दूषित झाले असल्याचा आरोप देखील राऊत यांनी फडणवीसांवर केला होता. आपल्याला आणि अनिल देशमुखांना नागपूरमधील नेत्यामुळेच तुरुंगात जावे लागल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला होता.

हेही वाचा – महाराष्ट्रात आणखी एक भावी मुख्यमंत्री….

या दौऱ्यातील अनिल देशमुखांच्या सोबत जेवण करतानाचा त्यांचे फोटो ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘गँग भोजन!’ असे कॅप्शन दिले आहे. राणे यांनी ट्विटरवर संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्यासोबत कुख्यात गुंड संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या गौतम भटकरसोबत जेवण करत असल्याचे फोटो प्रसारित करत अशा गुन्हेगारांसोबत राहाल तर जेलमध्य जावेच लागणार, असे म्हटले आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी भटकर यास ओळखत नसल्याचे म्हटले आहे. खासदार संजय राऊत यांच्यासह निर्मल टेक्सटाईल मीलची पाहणी केली. यावेळी तेथे सुमारे दीडशेहून अधिक लोक होते. पाहणीनंतर कंपनीच्या परिसरात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मी व राऊत यांनी तेथे भोजन केले. यावेळी तेथे आपल्यासोबत टेबलवरून बसून कुणी जेवण केले हे आपल्याला माहीत नाही. गौतम भटकर कोण आहे. त्याला मी ओळखत नाही, असेही देशमुख म्हणाले.

हेही वाचा – ‘हे’ आहेत एक, दोन, तीन क्रमांकाचे बसस्थानक; स्वच्छ, सुंदर म्हणून पुरस्कार…

ट्विट काय आहे?

बेलवरचे हे दोन्ही आरोपी कुणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर सोबत आहे. हा भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या. या भटकरवर मोक्कासुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्याच तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर आहेत. आता अशा गुन्हेगारांसोबत रहाल तर जेलमध्ये जावेच लागणार. मग भाषणात कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले! जैसी करनी वैसी भरनी!