नागपूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने नागपुरात आयोजित ‘युवा शंखनाद’ कार्यक्रमात मंत्री नितेश राणे युवकांचे बौद्धिक घेणार आहेत. देशाची सद्यस्थिती, युवकांची भूमिका आणि राष्ट्रनिर्मितीच्या विषयांवर ते संवाद साधणार आहेत.

चिटणवीस मैदानावर ‘युवा शंखनाद’चे आयोजन

भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिटणवीस मैदान येथे ‘युवा शंखनाद – विशाल युवा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून, भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या कार्यक्रमात नागपूर शहरातील पाच हजारांहून अधिक युवक सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

युवकांमधील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

देशातील सद्यस्थितीबाबत युवकांमध्ये विविध विषयांवरून संभ्रम निर्माण केला जात असून, चुकीची माहिती पसरवून त्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न काही विरोधी पक्षांकडून होत असल्याचा आरोप भाजप युवा मोर्चाने केला आहे. जंतरमंतर येथील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर युवकांना वस्तुस्थितीपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न होत असल्याची भूमिकाही संघटनेने मांडली आहे. काही कम्युनिस्ट आणि अर्बन नक्षल विचारसरणीच्या घटकांचा अशा घडामोडींमध्ये सहभाग असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

राष्ट्रनिर्मितीतील युवकांच्या भूमिकेवर मार्गदर्शन

युवकांनी भ्रामक प्रचाराला बळी न पडता देशहित, राष्ट्रनिर्मिती आणि लोकशाही मूल्यांचा विचार करून आपली भूमिका निश्चित करावी, हा या संवादामागील प्रमुख उद्देश आहे. देशाची सद्यस्थिती, युवकांसमोरील प्रश्न, राष्ट्रनिर्मितीतील तरुणांचे योगदान आणि सकारात्मक विचारांची दिशा यावर नितेश राणे मार्गदर्शन करणार आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी, शिकवणी वर्गांतील विद्यार्थी तसेच जेन झी आणि जेन अल्फा पिढीतील युवकांपर्यंत पोहोचण्यासाठी युवा मोर्चाची टीम प्रयत्नशील आहे.

सचिन करारे यांच्या नेतृत्वात नियोजन

युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सचिन करारे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदेश महामंत्री बादल राऊत व दीपांशू लिंगायत, प्रदेश सहकोषाध्यक्ष यश सातपुते, सचिव अमेय विश्वरूप, शहर महामंत्री रितेश पांडे, ऋषभ अरखेल, अथर्व त्रिवेदी, कुलदीप माटे, युवती प्रमुख प्रशंसा भोयर आणि संपर्कप्रमुख नागेश साठवणे यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी नियोजनात सक्रिय आहेत.