नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिपदाची जबाबदारी दिल्यामुळे बोलताना मर्यादा पाळाव्या लागत आहेत. अन्यथा यापेक्षाही अधिक आक्रमक भाषेत बोललो असतो, असे वादग्रस्त वक्तव्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी केले. नागपुरातील भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवा शंखनाद कार्यक्रमात बोलताना त्यांनी इंडिया आघाडी, हिंदुत्व आणि देशाच्या राजकीय विचारधारेवर भाष्य केले.
‘हिंदू राष्ट्र’ विषयावरून इंडिया आघाडीवर निशाणा
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने महाल परिसरातील चिटणीसपुरा पार्क येथे युवा शंखनाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना राणे यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. इंडिया आघाडीला २०४७ पर्यंत हिंदू राष्ट्राचे मुस्लीम राष्ट्रात रूपांतर करायचे आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून ‘रिजीम चेंज’ची भाषा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या विधानामुळे कार्यक्रमातील राजकीय वातावरण तापले.
‘आधी हिंदूंचे भले’ हीच भूमिका
भारत हे सर्वधर्मसमभाव राष्ट्र नसल्याचे सांगत राणे यांनी आपल्या राजकीय विचारधारेची भूमिका स्पष्ट केली. आधी हिंदूंचे भले आणि त्यानंतर इतर धर्मीयांचा विचार केला जाईल, ही आपली थिअरी असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे धार्मिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण येण्याची शक्यता आहे. सार्वजनिक पदावरील व्यक्ती म्हणून त्यांच्या वक्तव्याकडे विशेष लक्ष वेधले जात आहे.
मंत्रिपदामुळे संयम, अन्यथा अधिक आक्रमकता
आपल्या भाषणातील आक्रमकतेचा उल्लेख करताना राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्याला मर्यादा पाळाव्या लागत असल्याचे सांगितले. फडणवीस यांनी मंत्रिपद दिल्यामुळे बोलताना संयम ठेवावा लागतो; अन्यथा यापेक्षाही अधिक आक्रमक पद्धतीने बोललो असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. त्यांचे मार्गदर्शन सुटसुटीत आणि स्पष्ट होते, असे राणे म्हणाले. मात्र, मला या पदावर बसवले असते, तर तलवारीच काढल्या असत्या, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.
कार्यक्रमात युवकांमध्ये हाणामारी
दरम्यान, भाषण सुरू असतानाच कार्यक्रमस्थळी दोन युवकांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघांनी एकमेकांना मारहाण केल्याने काही काळ कार्यक्रमात व्यत्यय निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. दोन्ही युवकांना कार्यक्रमस्थळाबाहेर नेण्यात आल्यानंतर कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार कृष्णा खोपडे, आमदार राजीव पोतदार, महापौर नीता ठाकरे आणि भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
