यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील मानकिन्ही येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्यासमोर थेट जिवंत कोंबड्या दाखवत त्या वाहनांवर फेकत जोरदार आंदोलन केले. आज सोमवारी दुपारी हा खळबळजनक प्रकार घडला.
दुष्काळामुळे तलावात पाण्याचा थेंबही उरला नाही, मग मंत्री पाहणी नेमकी कसली करत आहेत? असा संतप्त सवाल करत शिवसैनिकांनी राणेंच्या गाड्यांसमोर जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे मानकिन्ही परिसरात काही काळ तीव्र राजकीय तणाव निर्माण झाला होता.
‘कोंबडी चोर’ आणि ‘वोट चोर’चे फलक
मंत्री नितेश राणे हे मानकिन्ही येथील स्थानिक तलावाची पाहणी करण्यासाठी आणि परिसरातील मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी यवतमाळ दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यांचा ताफा मानकिन्ही गावात पोहोचताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख रवी तरटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अचानक ताफ्यासमोर धाव घेतली. कार्यकर्त्यांनी हातात जिवंत कोंबड्या धरल्या होत्या आणि सोबतच ‘वोट चोर’ तसेच ‘कोंबडी चोर’ अशा उपहासात्मक घोषणा लिहिलेले फलक झळकावून सरकारचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
केवळ दिखाऊ दौऱ्यांचा आंदोलकांकडून आरोप
यवतमाळ जिल्ह्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरड्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील तलाव आणि धरणांमधील पाणीसाठा पार तळाला गेला आहे. यामुळे स्थानिक मत्स्यपालन व्यवसाय पूर्णपणे डबघाईला आला असून मच्छीमारांच्या कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. अशा भीषण परिस्थितीत पाणीटंचाईने होरपळणाऱ्या जनतेला मदत करण्याऐवजी सरकार केवळ दिखाव्याचे पाहणी दौरे करत असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला.
तात्काळ आर्थिक मदतीची मागणी
मच्छीमारांबद्दल सरकारला खरोखरच सहानुभूती असेल, तर केवळ पोकळ दौरे करून वेळकाढूपणा करू नका; शेतकरी आणि मत्स्यपालन व्यावसायिकांना तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करा, अशी आक्रमक मागणी ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रवी तरटे व आंदोलकांनी यावेळी केली. आंदोलकांनी या दरम्यान राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राणेंच्या ताफ्यासमोर अचानक झालेल्या या ‘कोंबडी’ आंदोलनामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना बाजूला केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर ताफ्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला. दरम्यान, या संपूर्ण घटनेची दृश्ये आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेने पोलिसांच्या गुप्त आणि सुरक्षेच्या योजनांचा बोजवारा उडाला.
