नागपूर : जबाबदार पदावर बसलेल्या व्यक्तीने जबाबदारीने भूमिका बजावली पाहिजे,असे मी मानतो.राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मुस्लिम आणि अल्पसंख्याक समाजाला एकत्रित कसे करू शकता, त्यांचे प्रबोधन कसा करू शकता, यावर भूमिका मांडली पाहिजे, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. ते आज नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
दोन समाजात तेढ निर्माण झाली तर अशांतता निर्माण होऊ शकते. आम्ही असताना दंगली होण्याचे काही कारण नाही. महाराष्ट्र शांत ठेवायचा असेल तर इको फ्रेंडली बकरी ईद हा पर्याय आहे. प्यारे खान टीव्हीवर माझ्यावर बोलतात, मात्र जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा हात जोडून उभे राहतात, असेही राणे म्हणाले.
प्यारे खान यांची जी भूमिका आहे, ती इस्लामला बदनाम करणारी आहे. जेव्हा इको फ्रेंडली होळी, इको फ्रेंडली दिवाळी, फटाके मुक्त दिवाळी असे असंख्य सल्ले हिंदू समाजाला दिले जातात. तेव्हा हिंदू समाज समजून घेतो. आम्ही दुसऱ्या धर्माला नावे ठेवत बसत नाही. हिंदू समाज आपला धाक दाखवत नाही. तसाच विचार मुस्लिमांनी करावा अशी माझी भूमिका व सल्ला आहे. जसे हिंदू समाज पर्यावरणवाद्यांचे ऐकतो आणि फटाके वाजवत नाही, रंग खेळत नाही, त्याप्रमाणे मुस्लिमांनी इको फ्रेंडली बकरी ईद करावी हा माझा चांगला सल्ला आहे, यामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रश्न कुठे आहे, असेही ते म्हणाले.
बकरी ईद मुळे हिंदू नागरिक अस्वस्थ आहे, कारण त्यांच्या सोसायटीमध्ये बकरे कापले जाणार, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होणार आणि दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होणार आहेत. उद्या यामुळे दंगली पण होऊ शकतात. हे थांबवण्यासाठी जर कोणी सल्ले देत असेल तर ऐकले पाहिजे. हिंदू समाजाला सल्ले दिले जाते, तेव्हा हिंदू समाज आक्रोश दाखवतो का? बळजबरी करतो का? मग अबू आझमी कसे बोलतो, हम तो बकरा काटेंगे. यावरूनच हिंदू समाजाचा समजूतदारपणा दिसून येतो. त्यामुळे कोण इस्लामला बदनाम करत आहे आणि कोण फडणवीस यांची बदनामी करत आहे हे महाराष्ट्राला कळते आहे.
प्यारे खान यांना मी सल्ला देतो त्यांनी मी काय बोललो याबद्दल विचार करावा आणि त्यांनीच मुस्लिम समाजाला आव्हान करायला पाहिजे की नितेश राणे जे बोलत आहे ते आपल्या हिताचे आहे. त्याप्रमाणे आपण इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करू, असेही ते म्हणाले.