नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे नवनवीन कल्पना मांडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. देशातील नामांकित हल्दिराम समूहाच्या मालकांनाच गडकरी यांनी नवीन खाद्यपदार्थ विकसित करण्याचा सल्ला दिला.

नागपुरातील रास्ता नॅशनल लेव्हल स्टार्टअप ॲन्ड इनोव्हेशन चॅलेंज पुरस्कार प्रदान समारंभात गडकरी बोलत होते. ‘आपल्याकडे सोयाबीनचे तेल तयार करताना मोठ्या प्रमाणात पेंड उरते. त्यामध्ये तब्बल ४९ टक्के प्रोटिन असते. या पेंडपासून शेव, चटणी किंवा इतर खाद्यपदार्थ तयार केले, तर गरीबांना कमी दरात प्रोटिनयुक्त अन्न पदार्थ उपलब्ध होऊ शकते.’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हल्दिराम समूहाच्या मालकांना हा सल्ला देतानाच शेतीपूरक उद्योग, जैवइंधन, हायड्रोजन आणि संशोधनाच्या गरजेवर भाष्य करत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. ग्रामीण भागातील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी स्वस्त दरात प्रोटिन उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

हल्दिरामच्या मालकांना नितीन गडकरी यांनी नेमका कोणता सल्ला दिला?

गडकरी म्हणाले, ‘काल हल्दिराम समूहाचे मालक भेटायला आले होते. त्यांना मी सांगितले की, सोयाबीन तेलापासून जी पेंड निघते, त्यात ४९ टक्के प्रोटिन असते. त्या पेंडपासून शेव, चटणी आणि इतर खाद्यपदार्थ तयार करता येऊ शकतात. त्यासाठी नवीन संशोधन आणि पाककृती विकसित करण्याची गरज आहे.’ या उत्पादनांची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी राहू शकते. ‘सध्या पेंड ४० रुपयांत मिळते. त्यापासून तयार होणारे पदार्थ जास्तीत जास्त १०० रुपयांच्या आत उपलब्ध होऊ शकतात,’ असेही गडकरी म्हणाले.

या कल्पनेमागचा मुख्य उद्देश काय आहे?

गडकरी यांच्या मते, देशातील गरीब आणि दुर्गम भागातील कुटुंबांना स्वस्त दरात प्रोटिन मिळणे अत्यंत आवश्यक आहे. ‘जास्तीत जास्त लोकांना प्रोटिनयुक्त अन्न मिळाले, तर कुपोषणाची समस्या कमी होऊ शकते,’ असे ते म्हणाले. अन्न प्रक्रिया उद्योगांनी संशोधनाकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तांदळाच्या पेंढ्यापासून जैव-सीएनजी निर्मितीबाबत गडकरी काय म्हणाले?

गडकरी यांनी तामिळनाडूमधील एका प्रकल्पाचा उल्लेख करताना सांगितले की, ‘पाच टन तांदळाच्या पेंढ्यापासून एक टन जैव-सीएनजी तयार होते.’ याच धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मौदा येथे रिलायन्स कंपनीने उभारलेल्या प्रकल्पात तांदळाच्या पेंढ्यापासून दररोज १२ टन सीएनजी तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हायड्रोजनबाबत गडकरींचे मत काय?

‘हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. टोयोटा कंपनीची ‘मिराई’ ही हायड्रोजनवर चालणारी गाडी मी वापरतो. ती अत्यंत उत्कृष्ट आहे,’ असे गडकरी म्हणाले. या तंत्रज्ञानावर वेगाने संशोधन सुरू असल्याचे सांगताना ते म्हणाले, ‘ल एका सादरीकरणात पाण्यापासून हायड्रोजन तयार करून त्यावर जनित्र चालवून दाखवण्यात आले.’

संशोधनाबाबत गडकरी यांनी कोणता संदेश दिला?

गडकरी म्हणाले, ‘आपली गरज काय आहे, आपण काय आयात करतो, आपल्याकडे कोणत्या गोष्टी अतिरिक्त आहेत आणि कोणता कचरा उपयोगात आणता येईल, याचा अभ्यास करून संशोधन केले पाहिजे. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार आणि उद्योगनिर्मिती होऊ शकते.’ पर्यावरणपूरक इंधन, शेतीमालावर आधारित उद्योग आणि स्थानिक संसाधनांचा वापर हीच भविष्यातील अर्थव्यवस्थेची दिशा असल्याचेही त्यांनी नमूद केले.