वर्धा: राजकारणात कधीही कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे सुभाषितवजा वाक्य प्रचलित झाले आहे. ते अयोग्य असे पण कोणी म्हणणार नाही. निकोप समाज जीवनाचे ते वैशिष्ट्य अशी पावती त्यास मिळते. राज्याच्या राजकारणात शरद पवार व नितीन गडकरी अशी ही या दोन नेत्यांची नावे याचा दाखला म्हणून दिली जात असतात.
असे मैत्र कोणाचे
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बहुपक्षीय संवाद कधीच लपून राहलेला नाही. त्याचा हा दाखला. वर्ध्याचे खासदार अमर काळे हे कट्टर भाजपविरोधी राजकारण करणारे. आता विरोधी पक्षातील म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे. पण मतदारसंघात कामे करायची तर सलोखा सर्वांशी असावा, अशी दृष्टी ठेवत भाजप मंत्र्यांशी भेटीगाठी घेतात. दोन जिल्ह्यास जोडणारा व ग्रामस्थ्यांची पायपीट थांबविणारा प्रकल्प प्रलंबित. हे काम नितीन गडकरी हेच करू शकतात, हे भान खा. काळे यांनी ठेवले. आणि आठवले गडकरी.
गडकरी व काळे स्नेही कसे
रस्ते वाहतूक मंत्री असलेल्या नितीन गडकरी यांच्याशी अमर काळे यांचे सौख्य कसे ? या प्रश्नाचे उत्तर इतिहासात आहे. २००४ साली लागलेल्या विधानसभा निवडणुकीत आर्वी मतदारसंघ काँग्रेस गोटात वादात आला होता. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रभा राव या आमदार अमर काळे यांची तिकीट कापणार, हे निश्चित मानल्या जात होते. शेवटच्या टप्प्यात पण काँग्रेस तर्फे आर्वी मतदारसंघ उमेदवार घोषित झाला नव्हता. तेव्हा आता काही खरे नाही म्हणून चर्चा सूरू झाली. काळे – गडकरी भेट घडली.
गडकरी यांनी हमी दिली की काँग्रेस जोवर तुझी तिकीट घोषित करीत नाही तोवर आर्वीत भाजप उमेदवार घोषित होणार नाही. काँग्रेस जर तुला तिकीट देत नसेल तर आम्ही देवू. तू ठरव, असा दिलासा नितीन गडकरी यांनी अमर काळे यांना दिला. पण याची कुणकुण लागताच अमर काळे हेच उमेदवार झाले. गडकरी यांनी असा शब्द दिला होता कां, या प्रश्नास खा. काळे यांनी दुजोरा दिला.

काळे म्हणतात, गडकरी मला…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वर्धा – अमरावती जिह्यास जोडणारा एक वेगळा पूल मंजूर केला. हा आर्वीशी संबंधित.पण त्यासाठी काळे गडकरी दरबारी पोहचले. काम फत्ते करून गावी आले. हे काम ३० ते ४० गावातील लोकांना दिलासा देणारे ठरणार. सायखेडा ते गोकुळसरा मार्गावरील या पुलाने वर्धा – अमरावती हे दोन जिल्हे थेट जोडले जातील. या परिसरातील हजारो नागरिकांना दोन्ही जिल्ह्यात ये – जा करणे अधिक सोयीचे ठरणार आहे. केंद्रीय रस्ते विकास निधीतून या साठी पैसे देण्याची हमी नितीन गडकरी यांनी दिल्याचे खा. काळे सांगतात.
खा. काळे यांची उपलब्धी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करीत हे काम मार्गी लागले. याबद्दल खा. काळे यांचा गोकुळसरा येथील गावकऱ्यांनी खा. काळे यांची भेट घेत आभार मानले. ग्रामस्थ म्हणतात की पिढ्यानंपिढया आम्ही वाहतूक अडचण भोगत आलो आहे. पण गडकरी यांनी शब्द दिल्याने काम मार्गी लागेल अशी खात्री आहे. तर खा. काळे म्हणतात की विकास कामात गडकरी हे पक्षातीत भूमिका घेत असल्याने हे शक्य झाले.
