नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या भन्नाट कल्पनांसाठी प्रसिद्ध आहेत. भारत इंधनासाठी आत्मनिर्भर व्हावा यावर त्यांचा अनेकदा भर असतो. त्यामुळे तणांपासून सीएनजी तयार करण्यावर भर देतात. आज अनेक चार चाकी वाहने ही सीएनजीवर आली आहे. गडकरींनी नागपूरमधील एका कार्यक्रमात सांगितले की, त्यांनी अनिल अंबानींना सीएनजी प्रकल्प उघडण्याची विनंती केली. यावर अंबानींनी सांगितले की, तुमचा प्रकल्प मला समजणारा नाही. मात्र, माझा मुलगा नियमित तुमचे व्याख्यान ऐकत असतो. आणि त्याने यावर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता अंबानी देशात ४०० बायोमास-टू-सीएनजी प्रकल्प उभे करणार असल्याची माहिती गडकरींनी यावेळी दिली.
कृषी कच्चा मालाची गरज ओळखा
गडकरींनी हेही नमूद केले की, आपली ६५ टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, तर जीडीपीमध्ये शेतीचा वाटा केवळ १२ टक्के आहे. त्यांनी सांगितले की, देशात १२४ असे जिल्हे आहेत, जिथे लोकसंख्येचा मोठा भाग सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना या जिल्ह्यांमधील वन-आधारित उद्योग, कृषी आणि ग्रामीण तंत्रज्ञान, तसेच आदिवासी भागांमधील संशोधनाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, अर्थव्यवस्थेत क्रांती घडवून आणण्याची क्षमता ग्रामीण भागात आहे. कृषी कच्चा मालाचे महत्व आपल्याला ओळखण्याची गरज आहे. यामुळे लक्षणीय विकास होईल आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
भारत १६ लाख कोटींचे इंधन आयात करतो
गडकरी म्हणाले , भविष्यात आपण ऊर्जा निर्यात करणारा देश बनले पाहिजे. विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याचे
आव्हान स्वीकारावे. ऊर्जेचे संकट ही आपली समस्या आहे. देशाच्या एकूण ऊर्जा वापरामध्ये सौर ऊर्जेचा वाटा ३८ टक्के आहे आणि तो वाढत आहे, परंतु जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेतही आपण औष्णिक ऊर्जेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तथापि, प्रदूषण ही आपल्या पर्यावरणासाठी आणि परिसंस्थेसाठी एक मोठी चिंता आहे आणि आपला देश १६ लाख कोटी रुपयांचे जीवाश्म इंधन आयात करत असे. त्यामुळे, आपल्याला हरित इंधनांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
भांडवली गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होईल
आपल्या देशात गूळ, बी-हेवी मोलॅसिस, ऊस, तुटलेला तांदूळ, बांबू, धान्य आणि शेतीतील कचऱ्यापासून हरित हायड्रोजन तयार करता येतो. आसाममध्ये बांबूपासून इथेनॉल तयार करण्याचा प्रकल्प आधीच सुरू झाला आहे. पानिपतमधील आयओसीएलचा प्रकल्प भाताच्या तणापासून दररोज १५० टन बायो-बिटुमेन तयार करतो. शेतातील तण हे हिवाळ्यात दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. हा प्रकल्प १ लाख लिटर बायो-इथेनॉलचे उत्पादनही करत आहे. याव्यतिरिक्त, मंत्र्यांनी माहिती दिली की आयओसीएल प्रकल्पात ५ टन पेंढ्यापासून १ टन बायो-सीएनजी तयार होतो. या संदर्भात त्यांनी सांगितले की, उद्योगासाठी पाणी, वीज, वाहतूक आणि दळणवळण आवश्यक आहे, ज्यामुळे भांडवली गुंतवणूक आणि रोजगार निर्माण होईल.
