नागपूर: केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून आत्मनिर्भर भारताचा नारा दिला जात आहे. सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे महागाई वाढत आहे. मागील काही दिवसात पेट्रोल, डिझेल, गॅससह इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील यावर भाष्य करत आवश्यकता असेल तेथेच वाहनांचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देशाला सामर्थ्यशाली बनविण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत त्यांनी सांगितले.

नेमके काय म्हणाले गडकरी

नितीन गडकरी यांनी शुक्रवारी १००% इथेनॉल इंधन नियमांवर स्वाक्षरी केली. याबाबत त्यांनीच शनिवारी नागपुरात माहिती दिली. मारुती, हिरो, टोयोटा कंपन्यांनी फ्लेक्स-फ्यूएल वाहने बाजारातही आणली असून आणखी कंपन्या १०० टक्के इथेनॉलवर धावणारी वाहने आणत आहे. केंद्रीयमंत्र्यांच्या या निर्णयामुळे देशाच्या पेट्रोलियम आयातीचे २५० अब्ज डॉलरची बचत होणार आहे. नागपुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक कंपन्या लवकरच दुचाकींसह १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहनांची निर्मिती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी मारुती सुझुकी वॅगनआर १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्यूएल मॉडेलमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यामुळे भारत आत्मनिर्भर होणार असून पेट्रोल डिझेलवर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही असे त्यांनी सांगितले.

पुढील दोन वर्षांत सर्वच वाहने इथेनॉलवरील

केंद्रीयमंत्री गडकरी यांनी पुढील दोन वर्षांमध्ये सर्वच वाहने इथेनॉलवर धावतील, असे सांगितले. मारुती सुझुकीने इथेनॉलवरील कार, काही कंपन्यांनी दुचाकीही बाजारात आणली. आता इतर कंपन्याही त्यांच्या कार तयार करीत आहेत. येत्या तीन महिन्यांत नागपुरात पाण्यावर चालणारी बसचा प्रयोग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. आज देशात ८७ टक्के गॅस व इतर पेट्रोलियम पदार्थ आयात केले जाते. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थावर आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावर सुरू आहे चर्चा

गडकरी म्हणाले, ‘देशाला आर्थिकदृष्ट्या अधिक सामर्थ्यशाली बनवायचे असेल, तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि कृषी क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढविणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात फारशी प्रगती न झाल्याने तेथील नागरिक शहरात येत आहेत. त्यामुळे शहरातील समस्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास अधिक झाला पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये वाहनांची संख्या वाढल्याने इंधनाची मागणीही वाढत चालली आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, इथेनॉलचे पेट्रोलमध्ये प्रमाण अधिक प्रमाण कसे वाढेल, यासाठी संबंधित कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.’