नागपूर : सध्या इराण व अमेरिकेच्या युद्धाची चर्चा आहे. अमेरिकेने युद्धाच्या सुरुवातीलाच इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांची हत्या केली. इराणच्या कट्टरपंथी व्यवस्थेत तुलनेने मवाळ व उदारवादी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची याच ओळखीची आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी भाजपाच्या स्थापना दिनी करून दिली. जहाजबांधणी मंत्री असताना इराणमध्ये चाब्बार नावाचा मोठा पोर्ट तयार करण्याचे सौभाग्य मला मिळाले. यादरम्यान आयातुला खोमेनी यांची त्यांच्या घरी भेट घेतली. यावेळी खोमेनी आणि गडकरींमध्ये पर्शियन आणि संस्कृत भाषेविषयी चर्चा झाली. याची सुंदर आठवण गडकरींनी सांगितली. तो काय किस्सा होता वाचा.

गडकरींनी नेमके काय सांगितले?

गडकरी खोमेनी यांच्याशी भेटले असता खोमेनी यांनी पर्शियन भाषा कुठून आली असा प्रश्न विचारला. मी म्हणालो, याबद्दल मला फार माहिती नाही. त्यावर खोमेनींनी सांगितले की, पर्शियन भाषा ही संस्कृतमधून आली असून संस्कृतच आमची मूळ भाषा आहे. इराणच्या तेरान युनिव्हर्सिटीमध्ये संस्कृत भाषेचे एक अध्यासन आहे. याशिवाय खोमेनी यांचे मूळ लखनऊ जवळील एका गावातील आहे, अशीही अशी आठवण करून दिल्याचे गडकरी म्हणाले. त्यामुळे आमची भाषा, वेशभूषा वेगळी असली तरी आम्ही सर्व एक आहोत. आमची संस्कृती एकच आहे, असेही गडकरी म्हणाले.

वाजपेयी यांची भविष्यवानी खरी ठरली

नागपुरात भाजपचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. ते म्हणाले, इराणला जाताना पाकिस्तानने माझे विमान थांबवले. पुढे जाऊ शकत नाही सांगितले. नंतर मी गुजरातला परत आलो अन् नंतर इराणला गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की अफगाणिस्तान. इराण आणि आजचा पाकिस्तान, असे सिंधू नदीपासून आर्य नदीपर्यंत आपले संबंध होते. यावेळी त्यांनी भाजपची स्थापना कशी झाली यावरही भाष्य केले. चाळीस वर्षांपूर्वी न्यू इंग्लिश महाल येथे राम जेठमलानी आणि शांतीभूषण यांच्या उपस्थितीत भाजपची स्थापना झाली. अंधार मिटणार ही अटल बिहारी वाजपेयी यांची भविष्यवाणी आज खरी ठरली असल्याचे ते म्हणाले.

भाजपची स्थापना पंतप्रधानपदासाठी झाली नाही

भाजपची स्थापना पंतप्रधान बनण्यासाठी झाली नव्हती. अटल बिहारी वाजपेयी नेहमीच सांगत होते की देशाचे पंतप्रधान कोण होणार हे महत्त्वाचे नाही तर देश मजबूत कसा होईल हे महत्त्वाचे आहे. त्याच दिशेने काम करीत आम्ही अनेक उद्दिष्ट आणि स्वप्न पूर्ण केलेत. विरोधकांनी आपल्याविरोधात टिका केली. परंतु आपला पक्ष सांप्रदायिक, जातीवादी किंवा कोणत्या धर्मा विरोधात नसल्याचे ते म्हणाले. अब्दुल रहमान अंतुले मुख्यमंत्री होते. त्यांनी मला ते कोकणस्थ ब्राह्मण असून आडनाव करंदीकर असल्याचे सांगितले. त्या काळात कोंबडी खाऊन उरलेला भाग कोणाच्या घरात फेकलं तर त्याला हिंदू धर्मातून बाहेर काढून दिले जात होते. काही पंडित व ब्राम्हणांच्या चुकीमुळे हिंदू धर्माचे नुकसान झाले. जातिवाद, अस्पृश्यता केली. मात्र प्रत्येक व्यक्ती हा धर्म, जातीने नव्हे तर गुणाने ओळखला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.