नागपूर: केंद्रीय नितीन गडकरी यांचा ६९ वा वाढदिवस विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे. गडकरींना शुभेच्छा देण्यासाठी भेटायला येणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे.
वाढदिवसाच्या दिवशी गडकरींनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी पेट्रोलच्या दरवाढीवर प्रश्न विचारला असता गडकरींनी चिंता व्यक्त करत दरवर्षी देशात २२ लाख कोटी रुपयांच्या कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. ही आयात थांबली तर देशातील फार मोठा पैसा वाचणार आहे. यावर गडकरींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भन्नाट उपाय सूचवला आहे. यामुळे पेट्रोलच्या दरात कितीही वाढ झाली तरी चिंता राहणार नाही असा दावा आहे.
काय म्हणाले गडकरी?
नितीन गडकरी यांनी सांगितले की, आपल्या देशामध्ये दरवर्षी २२ लाख कोटी रुपयांच्या कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. त्यामुळे देशातील मोठा पैसा हा विदेशात जातो. हाच पैसा जर वाचवता आला तर देशातील युवकांच्या हाताला रोजगार देण्यासाठी त्याचा उपयोग होईल. त्यामुळे पेट्रोलवर पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करणे आवश्यक आहे. आता मारोती सुझुकी कंपनीने एक कार तयार केली असून ती १०० टक्के इथेनॉलवर चालणार आहे. जून महिन्यात ही कार बाजारात येणार आहे, असेही गडकरींनी सांगितले. याशिवाय नागपूर महापालिकेने एक प्रकल्प तयार केला असून जून महिन्यात त्याचे उद्घाटन आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले. या प्रकल्पातून कचऱ्यापासून २२ टन सीएनजी तयार केली जाणार आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.
वाढदिवसानिमित्त गडकरींचा संकल्प
गडकरींनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प केला आहे. शहरातील एक लाख युवक आणि युवतींना सराव करता येईल इतक्या क्षमतेचे क्रिडांगण उभारण्याचा संकल्प गडकरींनी व्यक्त केला. हा संकल्प लवकरच पूर्णत्वास येणार असल्याचेही ते म्हणाले. याशिवाय शेतकरी आत्महत्या हा मोठा विषय आहे. यासाठी काम करणार असून शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवून त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही गडकरी म्हणाले.
२५ लाख झाडे लावणार
गडकरींनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला आहे. इथेनॉल आणि सीएनजी गाड्यांचा वापर वाढल्याने पेट्रोलवरील निर्भरता कमी होणार असून यापासून पर्यावरणाचे रक्षण होणार असेही ते म्हणाले. तसेच विविध शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांना सोबत घेऊन २५ लाख झाडांची लागवट करणार असल्याचेही गडकरींनी सांगितले.
