नागपूर: मी कुठल्याही पदासाठी तडजोड करत नाही. माझ्या मूल्यांकवर आणि लोकशाहीवर माझा विश्वास आहे. मी कधीही बॅनर लावले नाही किंवा हार तुरे घेऊन गेलो नाही.
जात, धर्म, पंथ यात कधी भेद करत नाही. कुणाला मत द्यायचे असेल तर द्या, अन्यथा देऊ नका, इतके स्पष्ट विचार आपल्या अनेक भाषणांमधून मांडणारे, राजकारण, समाजकारणात अग्रेसर असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस.
ते ६८ वर्षांचे झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता, पक्षाच्या कार्यक्रमांसाठी भिंती रंगवण्यापासून ते आज रोडकरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या गडकरींचा संषर्घमय प्रवास जाणून घेऊया.
गडकरींचा जन्म २७ मे १९५७ रोजी महाराष्ट्रातील नागपूर शहरात एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य गरिबीत गेले आणि त्यांनी आपल्या कुटुंबाला आणि शिक्षणाला हातभार लावण्यासाठी खूप संघर्ष केला. नितिन गडकरी यांनी एमकॉम, एलएलबी तसेच डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट (डीबीएम) मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. नितीन गडकरी यांच्या पत्नीचे नाव कांचन गडकरी आहे. त्यांना निखिल, सारंग आणि केतकी अशी तीन अपत्ये आहेत.
गडकरी यांनी विद्यार्थी दशकात असतानाच राजकारणात प्रवेश केला. १९७६ मध्ये ते अखिल भारतीय विद्या परिषद या विद्यार्थी राजकीय संघटनेत सामील झाले. विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. यावेळी नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या सर्व जागा अभाविपने जिंकल्या होत्या. अभाविपचे २८ वे राष्ट्रीय अधिवेशनही त्यांनी आयोजित केले होते.
वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाली. भाजपचे नागपूर शहर सरचिटणीस बनल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील विविध भागात संघटना मजबूत करण्याचे काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आणि वयाच्या ३२ व्या वर्षी ते नागपूर शहरातून आमदार झाले. १९९०, १९९६, २००२ आणि २००८ अशी सलग चार वर्षे त्यांनी हे पद भूषवले. त्यांनी आपल्या पक्षाची लोकप्रियता राज्यभर पोहोचवण्याचे काम केले. नंतर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सामील झाले. वयाच्या ४२ व्या वर्षी ते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले. देशात शंभरहून अधिक उड्डाणपुलांची मालिका बांधण्यात आली. विकासपुरुष, रोडकरी, अशा अनेक नावांनी त्यांना ओळखले जाते.
२००९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी गडकरींच्या नावाची घोषणा झाली. त्यानंतर गडकरींनी पक्षाला नवी ऊर्जा दिली आणि पक्षात नवा उत्साह संचारला. २०१४ मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आल्यावर त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर २०१९ आणि २०२४ मध्येही मोदी सरकारमधील अग्रेसर मंत्री म्हणून गडकरींची ओळख आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटच्या मालिकेत नागपूरमध्ये हायवे फ्लायओव्हर आणि मेट्रो रेलसह सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट (३.१४ किमी) बांधून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळवल्याबद्दल एनएचएआय आणि महा मेट्रो टीमचे हार्दिक अभिनंदन केले …