नागपूर: जनतेचे लाडके नेते आणि विकासकामांच्या माध्यमातून देशभरात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बुधवारी वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने त्यानिमित्त एन्रिको हाइट्स, हॉटेल रेडिसन ब्ल्यू जवळ, वर्धा रोड येथे सकाळी भव्य “वस्त्र तुला” करण्यात आली. यावेळी गडकरींच्या घरातील सर्व आप्तेष्टांनी मिळून त्यांना औक्षण केले. यात त्यांच्या नातवंडांचाही समावेश होता. यानंतर काही कपडे आणि पुस्तकांनी गडकरींची तुला करण्यात आली. यावेळी एका बाजूला गडकरी बसले होते तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजनाइतके कापडं आणि पुस्तके ठेवण्यात आली होती.

वस्त्रतुला म्हणजे काय ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरे केले जातात. ‘वस्त्रतुला’ हा धार्मिक आणि सामाजिक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये नितीन गडकरी यांच्या वजनाइतकी वस्त्रे (कपडे) किंवा खादीचे कापड मोजून दान केले जाते. ही एक सामाजिक आणि लोककल्याणकारी परंपरा आहे, ज्यामध्ये गोळा केलेली वस्त्रे गरजूंना, अनाथाश्रमांना किंवा संस्थांना वाटली जातात. याप्रसंगी अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आली होती.

गडकरींनी खादीच्या वापराला आणि विकासाला चालना देण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी खादीचे कपडे आणि इतर उत्पादनांच्या प्रसारावर भर दिला असून, खादीची उत्पादने तसेच खादीचे बूट देखील लॉन्च केले आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित वस्त्रतुला सोहळ्यामुळे अनेक गरीब आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात मिळतो.

सामाजिक सेवाभावाचा संदेश

सामाजिक जाणिवा आणि सेवाभाव जपत वाढदिवस साजरा करण्याचा, या उपक्रमामागे उद्देश आहे. गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूरसह देशभरात मोठ्या प्रमाणावर रस्ते, पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकास प्रकल्पांची उभारणी झाली आहे. विकासाभिमुख नेतृत्वासोबतच सामाजिक संवेदनशीलता जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख असून, त्यांच्यावरील प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, उद्योगजगताशी संबंधित व्यक्ती, नागरिक तसेच गडकरी समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.