नागपूर : देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचा विक्रम करीत असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याच मतदारसंघातील अमरावती मार्गाची मात्र अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. गडकरी साहेब, तुम्ही भव्य-दिव्य महामार्ग बांधा, उंचच उंच उड्डाणपूल उभारा. पण, जरा या मार्गाकडेही लक्ष द्या, अशी विनंती या नागरिकांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती मार्गावर भरतनगर ते दत्तवाडी दरम्यान रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. या रस्त्याची अंत्यत वाईट स्थिती असून अपघातामुळे प्राण जात आहेत. अमरावती मार्गावर कोंढाळीपर्यंत विविध उद्योग, गोदाम आहेत. या मार्गावर अंबाझरी आयुध निर्माणी आहे. तसेच दत्तवाडी हे नगरपरिषद असलेले मोठे गाव आहे. या मार्गावर अनेक नवीन नगर वसलेले आहेत. दत्तवाडीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा नागरी वस्त्या आहेत. यामुळे या भागातील नागरिकांची दररोज नागपूर शहरात ये-जा असते. पण यांना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून खड्ड्यातून मार्ग शोधत आणि जीव वाचवत वाहने चालवावी लागत आहेत. मोठे खड्डे आणि डांबर रस्त्यावरून निघालेली गिट्टी दुचाकी चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे.

पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील धक्कादायक Video

या संदर्भात वाडी येथील प्रशांत गणवीर म्हणाले, मी नागपुरात नोकरी करतो. दररोज मला याच रस्त्याने जे-जा करावी लागते. दत्तवाडीपर्यंत रस्ता खराब आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे आहेत. येथून वाहने चालवताना खूप त्रास होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी काही ठिकाणी खड्डे बुजवण्यात आले. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. तेथे पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. दाभा वळणावर देखील खूप खड्डे आहेत. पावसाच्या पाण्याने खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होत आहेत. दीड महिन्यापूर्वी आयसीएमआर समोर अपघात झाला. त्यात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला होता. त्याला खड्डा दिसला नाही, तो पडला आणि सरळ रस्ता दुभाजावर त्याचे डोके आपटले. या मार्गावर गेल्या दोन महिन्यांपासून उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे पुन्हा जड वाहनांमुळे रस्ते खराब होत आहेत.

चांदणी चौकातील उड्डाणपूल २ ऑक्टोबरला मध्यरात्री पाडण्यात येणार

वाहतूक योग्य रस्ता असणे बंधनकारक

रस्त्याचे किंवा उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यास कंत्राटदाराला रहदारीसाठी पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक असते. तसेच रस्त्याची डागडूजी करून तो वाहतुकीयोग्य करून देणे बंधनकारक आहे. परंतु कंत्राटदार चक्क केंद्रीय मंत्र्यांच्या मतदारसंघात अटी आणि शर्तीचा भंग करीत असल्याचे दिसून येत आहे.

मार्गाची स्थिती अत्यंत वाईट

अमरावती मार्गाची स्थिती दोन्ही बाजूने अत्यंत वाईट आहे. डागडूजी करण्यात आलेली नाही. उड्डाण पुलाचे काम झाल्यानंतर सिमेंट रस्ता होणार असल्याचे समजते. परंतु तोपर्यंत नागरिकांनी खड्ड्यातून वाहने चालवायची काय? – अश्विन कुळकर्णी, दाभा निवासी.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari build up highways and flyovers but pay attention in your ajmravati constituency road nagpur tmb 01
First published on: 24-09-2022 at 10:59 IST