केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये भरलेल्या कृषीप्रदर्शन समारोपाच्या कार्यक्रमात मंचावरच एका कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटण लावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात असं काय घडलं की थेट केंद्रीय मंत्र्यांनी कार्यकर्त्याच्या जॅकेटचं बटन लावलं असाही प्रश्न विचारला जात आहे. याशिवाय गडकरींच्या या कृतीचं अनेकांकडून कौतुकही केलं जातंय.

नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन (Agro vision) कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात नितीन कडकरी यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते. या ठिकाणी नितीन गडकरी यांनी उपस्थितांसमोर भाषण केल्यानंतर त्यांना आयोजकांकडून एक जॅकेट भेट देण्यात आलं.

गडकरींच्या सन्मानाने कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर समाधान

यावर नितीन गडकरी यांनी हे जॅकेट लगेच धोटे नावाच्या एका कार्यकर्त्यांना देऊ केलं. इतकंच नाही तर मंचावरच त्यांना ते घालायला लावलं. यावेळी गडकरींनी स्वतः धोटे यांच्या जॅकेटचं वरचं बटण लावून त्यांच्यासोबत फोटोही काढला. यामुळे धोटे यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला.

हेही वाचा : ..आणि रतन टाटा नितीन गडकरींना म्हणाले, “तुम्ही तर आमच्यापेक्षा हुशार निघालात, कारण…!”

सोशल मीडियावर अनेकजण नितीन गडकरींची ही कृती एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान करणारी असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत. तसेच गडकरींचं यासाठी कौतुक करत आहेत.