नागपूर : माझ्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत झालेल्या कार्यक्रमाला आशाताई आवर्जून उपस्थित होत्या. त्यांनी गाणे गाऊन मला आशीर्वाद दिले होते. आता देखील अगदी तीन महिन्यांपूर्वी त्यांच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी त्या थकलेल्या जाणवल्या, अशा शब्दात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुप्रसिद्ध गायिका पद्म विभूषण आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. संगीत क्षेत्रात लता दीदींनी जसे जागतिक स्तरावर देशाचे नाव मोठे केले, तीच किमया आशा भोसले यांनीही साधली. विदर्भाशी त्यांचे विशेष नाते होते. कविवर्य सुरेश भट यांच्या ‘केव्हा तरी पहाटे’सारख्या अनेक गझला त्यांनी अजरामर केल्या. त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली.
पुढची अनेक वर्षे त्यांची गीते भारतीय रसिकांच्या मनात घर करून राहणार आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण संगीतविश्वावर आणि भारतातील समस्त संगीतप्रेमींवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात आघात झाला आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांना परमेश्वराने द्यावी, असे गडकरी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
सुरांच्या वैविध्यांचे एक युग संपले – बावनकुळे
ज्येष्ठ गायिका, संगीताचे विद्यापीठ आशा भोसले यांच्या निधनाने सुरांच्या वैविध्यांचे एक युग संपले, अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जगण्यातला उत्साह आणि उत्साहाने जगणे त्यांनी शिकवले. तो उत्साह आज निमाला. आशा भोसले यांच्या निधनाने गाण्याचे, चैतन्याचे, शैलीदार माणुसकीचे, चविष्ट पाककेलेचे अभूतपूर्व साम्राज्य लोप पावले. कायम प्रसन्न आशादायी असलेल्या आशा, आज निराशा करून पुढच्या प्रवासाला निघून गेल्या. त्यांनी गायलेली कितीतरी गाणी मनात असून अजमरामर आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
संगीत क्षेत्राचे मोठे नुकसान -वडेट्टीवार
सप्तसुरांवर अधिराज्य गाजवणाऱ्या, आपल्या सुमधुर आवाजाने संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गायिका आशा भोसले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. पद्मविभूषण, ग्रॅमी, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित आशा भोसले म्हणजे भारतीय संगीताचा जगप्रसिद्ध आवाज होत्या. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असल्याचे कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नमुद केेले.
भारतीय संगीताचा अमर स्वर हरपला – मुनगंटीवार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीताचा अमर स्वर हरपला, अशी प्रतिक्रिया माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. आशा भोसले यांच्या अद्वितीय, बहुआयामी आवाजाने अनेक पिढ्यांच्या भावना व्यक्त केल्या आणि भारतीय संगीताला एक वेगळी उंची मिळवून दिली. माझ्या सांस्कृतिक कार्य मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्याचा मान मिळाला, हे माझे परमभाग्य आहे. अनेक अजरामर गीतांतून त्यांच्या स्वरांची जादू आजही आणि पुढील पिढ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात दरवळत राहील. त्यांच्या या सुरेल ठेव्यामुळेच त्या सदैव प्रत्येकाच्या हृदयात जिवंत राहतील, असेही मुनगंटीवार यांनी नमुद केले.
