नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व्यासपीठावरून जाहीरपणे कुणाला काय बोलतील याचा नेम नाही. ते कधी कार्यकर्ता तर कधी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढण्यास मागेपुढे पाहात नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या व्यासपीठावरून त्यांनी रविवारी मी प्रत्येक बाबीत बारकाईने लक्ष घालतो. त्यामुळे मला विद्यापीठाच्या दरवाज्यावरील झाडेही वाळलेली दिसली, असे नमूद करताना सरकारी व्यवस्थेवर प्रहार केला.

गडकरींचा नेम नेमका कुणावर?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातर्फे विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सत्कार आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विद्यापीठ परिसरातील गुरुनानक भवनात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मला वाईट सवय आहे, मी प्रत्येक बाबीत बारकाईने लक्ष घालतो. विद्यापीठाच्या दरवाज्यावरील झाडे वाळताना दिसली अन संंबंधितांना फोन केला. सरकारमधील लोक बारकाईने लक्ष घालत नाही, म्हणून कामे व्यवस्थित होत नाही, असे नमुद करताच सभागृहात हशा पिकला. विद्यापीठही सरकार आहे. मी काही सरकारी नाही. मी राजकीय आहे. तुम्ही जर चूक केली तर बोलायला मागेपुढे पाहात नाही. त्यामुळे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. विद्यापीठाचे सभागृह बांधले, परंतु यात कुठलेही कौशल्य दिसत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. परिसरात कचरा आहे. स्वच्छतेसाठी पैसा लागत नाही. हा पैशाचा नाही तर जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येकाने ती घेतली पाहिजे. आर्थिक अडचणी असतात, पण समाजाकडून मदतही मिळते, असे ते म्हणाले.

‘क्रीडा मैदानाच्या आरक्षणावर नजर’

गडकरी म्हणाले, उत्तम प्रशिक्षकाशिवाय उत्तम खेळाडू तयार होऊ शकत नाही. उत्तम प्रशिक्षकांसोबतच सर्वोत्तम सुविधाही मिळाल्या पाहिजे. १ लाख मुले दररोज खेळू शकतील, एवढी मैदाने शहरात तयार करायची आहे. अनेक महाविद्यालयांकडे मैदाने आहेत. पण सुविधा नाही. ही मैदाने विकसित करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला पाहिजे. उन्हाळ्यात मैदानाची स्थिती वाईट असते. प्रक्रिया केलेले पाणी विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या मैदानासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ते म्हणाले. महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व एनएमआरडीएकडून मैदानांचे आरक्षण सुरक्षित केले आहे. त्याचे आरक्षण कायम राहील, याकडे माझे लक्ष आहे, असे ते म्हणाले. नुकताच दाक्षिणात्य अभिनेते मोहनबाबू माझ्याकडे आले होते. त्यांचे महाविद्यालये आहेत. त्यांनी रजनीकांत यांना फोन केला. मी रजनीकांत व मोहनबाबू दोघांनाही खासदार सांस्कृतिक महोत्सवासाठी बोलावले, असे ते म्हणाले.

झाडे लावण्याचा उपक्रमात अपेक्षित यश मिळाले नाही

खेळाची मैदाने व उत्तम उद्यान समाजासाठी आवश्यक आहे. यावर्षी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला. अनेकांना सोबत घेऊन प्रयत्न केला. पण त्यात अपेक्षित यश मिळाले नाही. विद्यापीठातील विद्यार्थ्यांची रचनात्मक शक्ती पुढे आली तर चांगले काम होऊ शकते. महाविद्यालये, शाळांची मैदाने चांगले करण्यासाठी खासदार निधी देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. शहराच्या चारही बाजूने चार क्लब बांधण्याचे काम हाती घेतले आहे. प्रत्येक क्लबमध्ये दीड ते दोन हजार मुले खेळतील. लवकरच ते काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. या सुविधांचा लाभ विद्यार्थी, विद्यार्थीनीनी घेण्याची व कौशल्य विकसित करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

प्राध्यापकांना सल्ला, स्वत:च्या कामाचेही ऑडीट करा

तुम्ही वेतन आयोग वाढवा, पण स्वत:च्या कामाचेही ऑडीट करा. मी चांगले काम नाही केले तर मला लोक मला बदलून टाकतील. परंतु अधिकारी स्थायी आहे. त्यांना बदलवता येत नाही. चांगले काम करणाऱ्यांना सन्मान मिळाला पाहिजे व वाईट काम करणाऱ्यांना शिक्षाही झाली पाहिजे, तेव्हाच विद्यापीठात चांगले काम होईल. पण हे मी नागपूर विद्यापीठाबाबत नाही बोलत, चूकुून माझे बोलणे कुणाला फिट बसले असेल तर माफ करा, असे गडकरी म्हणाले.