नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना ई-२० पेट्रोल धोरणावरून समाजमाध्यम इन्फ्लूएन्सर्सने ट्रोल केले. काही समाज माध्यम खात्यांवरून आणि युट्यूब व्हिडिओंद्वारे त्यांची बदनामी करणारे मजकूर प्रसारित करण्यात आले होते. त्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. आता रविवारी नागपुरात त्यांनी माध्यमासह ‘इन्फ्लूएन्सर्स’वरही टीका केली.

‘त्यांच्या’कडे लक्ष न देण्याच्या सूचना

महापालिकेच्या माध्यमातून अंबाझरी तलाव जलपर्णीच्या विळख्यातून पूर्णतः मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महापौर नीता ठाकरे यांनी रविवारी येथे जलपूजन केले. जलपूजनानंतर त्यांनी पत्रकारांसोबतही संवाद साधला. त्यांनी यावेळी माध्यमे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवर टीका केली. ते म्हणाले, काम केले तरी टीका करतात आणि नाही केले तरी टीका करतात. त्यामुळे त्याकडे लक्ष न देता जे शहराच्या हिताचे आहे ते झाले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले. पाण्यावर उतरणाऱ्या विमानांच्या माध्यमातून नागपूर-अंभोरा आणि मध्य प्रदेशातील सिवनी सारख्या ठिकाणांना जोडता येईल व नागपूरला पर्यटनाचे केंद्र बनवता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमआयडीसीला इशारा

अंबाझरी तलावात एमआयडीसी व वाडी नगर परिषदेतून प्रदूषित पाणी येणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. परंतु वारंवार सूचना देऊनही प्रदूषित पाणी आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा गडकरी यांनी दिला. ‘नीरी’ मार्फत तलावात येणाऱ्या पाण्याची बीओडी व सीओडी चाचणीचा अहवाल मागवण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.

जलविहाराचा लुटला आनंद

अंबाझरी येथे जलपूजन केल्यानंतर त्यांनी नौकाविहाराचा आनंद घेतला. यावेळी खासदार माया इवनाते, आमदार सर्वश्री कृष्णा खोपडे, परिणय फुके, संजय भेंडे, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, माजी आमदार प्रा. अनिल सोले, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, वनविभागाचे हाडा यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

तलावात जलक्रीडा विकसित

ते म्हणाले, अंबाझरी तलावातून नाग नदी प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. भविष्यात अंबाझरीतून नावेत बसून अंभोऱ्यापर्यंत जाता आले पाहिजे, अशी संकल्पना असून हे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही, असे त्यांनी नमूद केले. अंबाझरी परिसरात वॉटर स्पोर्ट्स विकसित करण्याचीही कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. हॉवरक्राफ्ट आणण्यासाठी रशियाला ऑर्डर दिली होती. हॉवरक्राफ्ट पाण्याच्या पृष्ठभागापासून सुमारे दीड फूट उंचीवर धावते. नागपुरातही सुरक्षेची सर्व काळजी घेऊन साहसी जलक्रीडा विकसित करता येतील, असे त्यांनी सांगितले.