नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे कुटुंबीय लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा काढून शैक्षणिक क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. शनिवारी भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेच्या (आयसीटीआरडी) सचिवालय इमारत तसेच स्टार्टअप इन्क्युबिशन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात गडकरी यांनीच ही माहिती दिली.

या कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, संजय भेंडे, मिलिंद कानडे, योगेश बोंडे, नंदा जिचकर, केतन मोहितकर उपस्थित होते. यावेळी गडकरी म्हणाले, आमच्या कुटुंबीयांची शैक्षणिक संस्था नाही. आम्ही कधीच या क्षेत्रात नव्हतो. परंतु मला माझ्या आईच्या स्मृतीत एक शाळा काढायची आहे. माझ्या सुनेची तशी इच्छा आहे. त्यासाठी आम्हाला टाटा टोपे सोसायटी व इतर तीन सोसायटींकडून जागा मिळाली आहे.

या जागेची किंमत १३ कोटी रुपये असून रेडीरेकनरनुसार ती २६ कोटी आहे. हे पैसे कुणाकडून उधार घ्यायचे नाही. त्यांची व्यवस्था करायची आहे. दरम्यान ही शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची असावी म्हणून मी अंबानी कुटुंबीयांशी बोललो. मुंबईतील ओबेराॅय यांची व इतर अशा एकूण पाच शाळांचे निरीक्षण माझ्या कुटुंबीयांनी केले, असेही गडकरी यांनी सांगितले.

सरकारच्या पायात पाय घालू नका

कोणत्याही कामासाठी सरकारच्या पायात पाय घालू नका. पाय घातल्यास संयुक्त सचिवांचे परिपत्रक सुरू होते. मी संस्था व उद्योजकांना यशस्वीतेसाठी सरकारपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. सरकारी योजनेचा लाभ घ्या. हे काम झाल्यावर सरकारी अधिकाऱ्यांना हात जोडून मार्गदर्शन संपवा. स्वत: काम केल्यास मोठे यश मिळते, असेही गडकरी यांनी सांगितले.

शेती, आदिवासींशी संबंधित संशोधनावर लक्ष द्या

भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषदेने (आयसीटीआरडी) शहरी भागातील स्टार्ट अपसह येथील उद्योगाशी संबंधित विषयावर आणखी संशोधन करावेच. परंतु सोबतच ग्रामीण भागातील कृषी व आदिवासीशी संबंधित जल, जंगल, जमिनीवर आधारीत विषयावरही काम करायला हवे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होणार

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री पदाची धुरा सांभाळली तेव्हा लिथियम आयर्न बॅटरीची किंमत १५० डाॅलर प्रति किलोव्हॅट होती. यावेळी लोक मला इलेक्ट्रिक वाहन रस्त्यावर बंद पडल्यास तुम्ही सुरू करणार काय म्हणत हसत होते. परंतु आता बॅटरीची क्षमता त्यावेळेहून तिप्पट झाली आहे. आता या बॅटरीची किंमत ५० डॉलर प्रति किलोव्हॅटवर आली आहे. त्यामुळे लवकच इलेक्ट्रिक वाहनांची किंमत कमी होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.