उच्च न्यायालयाची कार्यक्रमाला परवानगी

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त कस्तूरचंद पार्क मैदानावर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्याला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने परवानगी दिली आहे. या मैदानावर स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम वगळता इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यापूर्वी उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. त्यानंतर गडकरी सत्कार समितीने ही परवानगी मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

कस्तूरचंद पार्क याला ऐतिहासिक वारसा प्राप्त असून त्या ठिकाणी वर्षभर विविध प्रदर्शन, कार्यक्रम भरविण्यात येतात. त्यामुळे मैदानाची दुरावस्था झाली असून ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय त्या ठिकाणी अनेक गैरप्रकारही चालतात, अशा आशयाची जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्या. भूषण गवई आणि न्या. अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना नोटीस बजावली.

तसेच अंतरिम आदेश पारित करून मैदानाचा ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाशिवाय इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये. इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यासाठी उच्च न्यायालयाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असल्याचा अंतरिम आदेश पारित केला होता.

मात्र, २७ मे ला नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्ते एक सत्कार कार्यक्रम घेत आहेत. या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवाय गडकरींना झेड-प्लस सुरक्षा असल्याने अतिशय सुरक्षित व हजारोंची उपस्थिती राहू शकेल असे ठिकाण शहरात नाही. त्यामुळे कस्तूरचंद पार्क मैदानावर कार्यक्रम घेण्याची अनुमती मिळावी, अशी विनंती गडकरी सत्कार समितीने उच्च न्यायालयात एका अर्जाद्वारे केली. त्या अर्जावर न्या. भूषण गवई यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने कार्यक्रमाला परवानगी दिली.

मात्र, ऐतिहासिक वारशाला कोणताही धक्का पोहोचणार नाही  आणि मैदान पूर्ववत करून  देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधितांवर अटी घालाव्यात, असे निर्देश दिले.

नितीन गडकरींच्या सत्कार समारंभाला नारायण राणे येणार

नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा २७ मे रोजी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे उपस्थित राहणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा असताना गडकरी यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असताना त्यांनी गुजराथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर पुण्याला झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत राणे प्रवेश करतील, अशी चर्चा होती. मात्र, त्याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. नितीन गडकरी यांचा नागपुरात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी आणि नरखेडमधील थडीपवनीला नितीन गडकरी कृषी विकास व कौशल्य विकास केंद्राच्या उद््घाटनप्रसंगी राणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.