नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे कृषीसह इतरही क्षेत्रात नवनवीन प्रयोग राबवण्यासाठी ओळखले जातात. नागपुरातील ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात गडकरी यांनी विदर्भात गायींची संख्या झपाट्याने वाढवण्याचा नवीन फाॅर्मुला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थित शेतकऱ्यांना सांगितला. या नावीन्यपूर्ण कल्पनेबाबत आपण जाणून घेऊ या.

कार्यक्रमाला मंचावर केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, ॲड. आशिष जयस्वाल, डाॅ. पंकज भोयर, सुधीर मुनगंटीवार, मदर डेअरीचे अध्यक्ष दिनेश शहा आणि इतरही कृषी क्षेत्राशी संबंधित उच्च पदस्थ अधिकारी व तज्ज्ञ उपस्थित होते. नितीन गडकरी म्हणाले, विदर्भातील शेतकऱ्यांचा विकास होत नसल्याचे काही लोक सांगतात. हा प्रकार लग्नानंतर वरा ला मुलगा होत नसल्याने इतरांना दोष देण्यासारखा आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून या समस्येवर तोडगा शक्य आहे. सध्या पुणे, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात दुघाचे उत्पादन ७० ते ९० लाख लिटरपर्यंत होते. परंतु विदर्भातील अकरा जिल्ह्यात मात्र दुधाचे उत्पादन केवळ २५ लाख लिटर आहे. या दुधाची उत्पादकता वाढवण्यासाठी पशु व मत्स विद्यापीठाकडून काम केले जात आहे.

दरम्यान भारतातील गिर जातीची गाय ब्राझीलमध्ये गेली होती. तिच्यावर प्रयोग करून आता ही गाय ६० लिटरपर्यंत दूध देत आहे. दुसरीकडे आता गायींना गोरीच जन्माला येईल असे तंत्रज्ञानही विकसीत झाले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानावर काम करण्याची गरज आहे. दरम्यान शासन शेतकऱ्यांना २५ हजार गायी वाटणार आहे.

परंतु प्रत्यक्षात येथे दहा गायींचेही उत्पादन होत नाही. त्यामुळे मदत डेअरीने विदर्भात या गोष्टीवर विशेष काम करावे. त्यासाठी कुक्कुट पालन, बकरी पालन सारखे गाय पालनावर काम करावे. जेणेकरून गायींची संख्या झपाट्याने वाढून शेतकऱ्यांना जोड व्यवसाय म्हणून दुधाचाही व्यवसाय करता येईल. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणे शक्य असल्याचेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

ॲग्रो व्हिजनद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून येथे विविध कार्यशाळेत शिकणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना लाभ होऊन त्यांच्या शेतीचे उत्पादन व उत्पन्न वाढत असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

कृषी विद्यापीठातील शिक्षक, अधिकाऱ्यांना वेतन देऊ नका…

आमदार, मंत्री असतांना मी नेहमीच कृषी विद्यापीठातील शिक्षक, अधिकाऱ्यांना शासनाने वेतन देऊ नये, असे मत मांडत होतो. या सगळ्यांनी प्रथम शेती संशोधनातून विकसीत करावी. त्यातून विविध पिकाद्वारे उत्पन्न वाढून विद्यापीठ नफ्यात आल्यास या भागातील शेती नफ्यात येईल असे माझे मत होते, असेही गडकरी यांनी सांगितले.