नागपूर : नागपुरात गल्लोगल्ली मोकाट कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत आहेत. एखाद्या वाहनापुढे कधी येईल अन् अपघात होईल, याचा आता नेम राहीला नाही. नागपूरकरांना दररोज मोकाट कुत्र्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाचा अनुभव आला. त्यांचे भाषण सुरू असतानाच सभेत मोकाट कुत्रे शिरले अन् एकच गोंधळ उडाला. गडकरींनीही यावेळी समर्थन देण्यासाठी आला की काय, असे वाटले असे नमुद करताच सभेत हशा पिकला.
महापालिका निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू झाली असून दररोज मोठ्या सभा होत आहे. आज केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी वाठोडा, शांतीनगर घाट परिसर तसेच कळमन्यात उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. वाठोडा घाट परिसरात रात्री सात वाजता त्यांची सभा होती. सभेसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. नागरिकांची गर्दी झाल्यानंतर गडकरी यांनी भाषणाला सुरुवात केली.
पूर्व नागपुरातील कोट्यवधीच्या विकास कामांची माहिती देताना गडकरी जोशात होते. त्यांच्या या जोशपूर्ण भाषणात याच परिसरातील मोकाट कुत्र्यांनी अडथळा आणला. किंबहुना गडकरींचे लक्षच या मोकाट कुत्र्यांनी आपल्याकडे वेधले. अशा प्रसंगात गडकरींचा मिश्किलपणा नेहमीच जागा होता. यावेळीही त्यांनी ‘आता कुत्रा गेला, मला वाटल समर्थन देण्यासाठी आला की काय?’ असे नमुद करताच गर्दीतून हास्याचे फवारे उडाले. हा हास्याचा भाग सोडला तर त्यांनी यावेळी या प्रभागात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात असून उमेदवारांनी निवडून आल्यानंतर या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी सूचना केली. आता निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कुत्र्यांकडे या उमेदवारांना लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी सभेतून कुत्रे हाकलून लावत सुरुवातही केली. दरम्यान, या सभेत गडकरी यांनी विकास कामाचीही माहिती दिली.
नागपूर मेट्रो होणार सहा डब्याची
त्यांनी सध्याची मेट्रो तीन डब्याची असून सहा डबे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर नागरिकांना घरापर्यंत पोहोचता येईल, यासाठी मेट्रोची स्वत:ची बस सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
प्लास्टिकपासून पेट्रोल तयार करण्यात येणार आहे. २८ टन सीएनजी तयार होईल. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलवरील वाहने खरेदी करू नका, सीएनजीवरील दुचाकी घ्या, येथील सीएनजी कमी दरात मिळेल, असे त्यांनी नागरिकांना सांगितले. पुढील मार्च महिन्यात या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल, असे ते म्हणाले.
पाच वर्षांचा स्पष्ट विकास आराखडा भाजपकडे
सक्षम नेतृत्व, अनुभवी नगरसेवक, अभ्यासू प्रशासकीय दृष्टिकोन आणि मैदानात सतत काम करणारी कार्यकर्त्यांची टीम यामुळे भाजपचे निर्णय जलद आणि परिणामकारक ठरतात. पुढील पाच वर्षांचा स्पष्ट विकास आराखडा भाजपकडे तयार असून, नागपूरकरांनी संधी दिल्यास त्या संधीचे निश्चितच विकासात रूपांतर केले जाईल, अशी ग्वाही गडकरी यांनी सकाळी प्रभाग क्रमांक ३७, ३८, ३५ , २८ साठी घेतलेल्या सभेत व्यक्त केली.
