नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरजवळील धापेवाडा येथे ‘धापेवाडा टेक्सटाईल’ प्रकल्पांतर्गत सिल्क साडीनिर्मिती उद्योग सुरू करण्यात आला आहे. या साडीला खूप मागणी असल्याचे नेहमी जाहीरपणे आपल्या भाषणातून सांगतात. रविवारी अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांना गडकरी यांनी सिल्क साडीच्या निर्मिती प्रक्रियेपासून तर बाजारात येईपर्यंतची प्रक्रिया सांगितली.

सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच खासदार हेमा मालिनी यांनी रविवारी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी नितीन गडकरी व कांचन गडकरी यांनी धापेवाडा येथील होतकरू महिलांनी हातमागावर विणलेली करवत काठी साडी हेमा मालिनी यांना भेट दिली. यावेळी गडकरी यांनी धापेवाडा येथील सूती साडीला जकाटची बॉर्डर करण्याचे काम सुरू असल्याचे व या प्रकल्पातून नागपूरसह विदर्भाला सूती हातमाग व पॉवरलूम साडीची ओळख देण्याचा प्रयत्न असल्याचे हेमामालिनी यांना सांगितले.

विशेष म्हणजे मागील वर्षी जुलैमध्ये अॅग्रोव्हिजनच्या एका कार्यक्रमात गडकरींनी हेमामालिनी यांना या टेक्सटाईल प्रकल्प पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. नागपूरसह विदर्भ एकेकाळी हातमाग व पावरलुमच्या साड्यांसाठी प्रसिद्ध होते. ही ओळख पून्हा निर्माण करण्यासाठी धापेवाडा येथे धापेवाडा टेक्सटाईल नावाने पिवर सिल्कचा कारखान्यावर काम सुरू आहे. येथे प्राथमिक स्वरूपात तयार होणाऱ्या साड्यांवर झारखंड येथे प्रिंटचे काम केले गेले. त्यामुळे ही साडी इतकी सुंदर झाली की त्याला सर्वत्र मागणी वाढली असल्याचे त्यावेळी गडकरी म्हणाले होते. दरम्यान धापेवाडातील टेक्सटाईल्सची वास्तू सुमारे सहा महिन्यात पूर्ण होईल व येथे कार्यक्रमासाठी हेमा मालिनी यांना आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले होते. हेमा मालिनी यांना मी येथे धापेवाडाला तयार होणाऱ्या साडीतच येण्याची विनंती करणार असल्याचेही नितीन गडकरी म्हणाले होते. हेमा मालिनी येथील साडीवर आल्यास स्वाभाविकपणे या साडीची मार्केटिंग होईल, असेही त्यांनी सांगितले होते. आज गडकरी यांनी यावरच हेमामालिनी यांच्यासोबत चर्चा केल्याची शक्यता आहे.

दरम्यान या प्रकल्पात सूती साडीला जकाटची बॉर्डर करण्याचे काम सुरू आहे. ते झाल्यास ही साडी केवळ ४०० रुपयांत उपलब्ध होईल. या साडीची किमत बाहेर दोन ते तीन हजार रुपये आहे. परंतु ही साडी गरीब व मध्यमवर्गीय महिलांना केवळ ४०० रुपयांत उपलब्ध केली जाईल. त्यातही विनकरीचे काम करणाऱ्या महिलेला ६० रूपये प्रति साडी मजूरी, १० रुपये ट्रस्टच्या खात्यात जाईल. या प्रकल्पामुळे पून्हा नागपूरसह विदर्भाला सूती हातमाग व पॉवरलूम साडीची ओळख देण्याचा प्रयत्न असलयाचेही नितीन गडकरी यांनी सांगितले होते.