राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल अहीरकर हे विद्यार्थी चळवळीतून आले. मीदेखील विद्यार्थी चळवळीतून आलो असल्याने गल्ली-गल्लीतील राजकारण ठाऊक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

अनिल अहीरकर यांच्या षष्ठय़ब्दीपूर्ती कार्यक्रम प्रयास या संस्थेच्या वतीने गांधीसागर तलावाजवळील रजवाडा पॅलेसमध्ये रविवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी कुलगुरू हरिभाऊ केदार, माजी आमदार दीनानाथ पडोळे, शब्बीर विद्रोही व्यासपीठावर होते.

गडकरी यांच्या हस्ते अनिल अहीरकर आणि त्यांच्या पत्नी सुरेखा अहीरकर यांचे ६० किलोच्या पुष्पहाराने अभिष्टचिंतन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलो असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे माझे नेते आहेत, असे सांगून राजकारणात जेवढे मित्र असतात, त्यापेक्षा अधिक विरोधक असतात. परंतु हे राजकारण लोकांसाठी असेल पाहिजे, असे दत्ता मेघे म्हणाले. स्वतमधील बळस्थाने ओळखली नाही आणि पुढे निघाला. स्वतवरील विश्वास माणसाला जगायला शिकवतो. हे अहीरकरांनी दाखवून दिले आहे, असे हरिभाऊ केदार म्हणाले. यावेळी अनिल देशमुख यांचेही भाषण झाले. शब्बीर विद्रोही यांनी अहीरकरांवर कविता केली.