नागपूर : कोणतीही बँक सुस्थितीत असेल तर त्याचे श्रेय बँकेच्या संचालक मंडळाला जाते. घोटाळ्यांमुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांनी ते वेळेत परत केले नाही तर संचालकांपुढे अडचणी निर्माण होतात. मी सुद्धा सहकार क्षेत्रातील आहे. बँक चालविण्यासाठी जी चळवळ आहे, त्यावर बँकेची पत नाही तर नेतृत्त्वामुळे असते. बँकेत घोटाळा झाला तर अनेक संचालकांना कारागृहात जावे लागले, त्यांच्यावर कारवाई झाली, असे नमुद करीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या कार्यक्रमातून संचालकांना इशारा दिला. बँकेची विश्वसनीयता सर्वात मोठे भांडवल आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकतर्फे रेशीमबाग येथील महात्मा फुले सभागृहात आयोजित सेवानिवृत्त भागीदारांना हितलाभ निधी, भागधारकांच्या मुलांना शिष्यवृत्ती व त्यांच्या सत्कार समारंभात केंद्रीयमंत्री गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, माजी महापौर दयाशंकर तिवारी, बँकेचे अध्यक्ष गोविंदा दावळे उपस्थित होते.

गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक सुस्थितीत असल्याबाबत कौतुक केले. बँकेला १.७ कोटींचा नफा झाला, ही बाब चांगली आहे. ‘ग्रॉस एनपीए’ही सुस्थितीत येईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी गडकरी यांनी नागपुरात सिम्बायसिस विद्यापीठाला जागा देताना नागपुरातील विद्यार्थ्यांना १५ टक्के सवलतीचा करार केला होता असे नमुद करीत महापौर निता ठाकरे यांना एक बैठक घेण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चांगले शिक्षण मिळायले पाहिजे. निवृत्तांना आता आरबीआयने पेंशन बंद केली. निवृत्तीधारकांना आता व्हीसा कार्डचा लाभ घ्यावा, मी कंपनीशी चर्चा करतो, असे ते म्हणाले.

भागधारकांना लाभ मिळाला पाहिजे तसेच सहकार कायद्यानुसार ज्या योजनांतून लाभ देता येईल, ते द्यावे. निवृत्त नागरिकांसाठी शहरात मैदान तयार करण्याची गरज आहे. त्यांच्या मनोरंजनाची सोय करावी. मैदानाचा विकास करताना त्यात ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळाचा विचार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी महापौर निता ठाकरे यांना केल्या. सूर्यनगरात अपंगांसाठी पार्क तयार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांसाठी असे काही करता येईल का, त्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

कल्याणेश्वर मंदिराचा १७१ कोटींत विकास

नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक कल्याणेश्वर मंदिराला लागून आहे. या मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. परिसर विस्तीर्ण करण्यात येईल. त्यासाठी १७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे बँकही प्रशस्त होईल. येथे बँकेची सभा घेता येईल, असे सभागृह असेल. या ठिकाणी भूमिगत वाहनतळ राहील, असे त्यांनी सांगितले.