नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर जिल्ह्यात वाढते वायूप्रदूषण आणि इंधन दरांतील सातत्यपूर्ण वाढ यामुळे पर्यावरणपूरक वाहनांकडे नागरिकांचा कल वाढत आहे. बघता-बघता ही संख्या ४९ हजार ५६५ वर पोहचली आहे. ई-वाहनांच्या वाढत्या संख्येला पूरक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर देत महावितरणने जिल्ह्यात ३०७ सार्वजनिक चार्जिंग केंद्रांचे जाळे निर्माण केले आहे.

घरगुती वीजजोडणीद्वारे चार्जिंगची सोय असली तरी, दीर्घ प्रवासादरम्यान किंवा तातडीच्या गरजांसाठी जलद चार्जिंग केंद्रांची आवश्यकता भासते. ही गरज लक्षात घेऊन महावितरणने शहरासह ग्रामीण भागातही केंद्रे उभारली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ऊर्जा खाते आहे. तेही नागपुरातील युवानांच्या सुविधेवर विशेष लक्ष ठेवून असतात. ऊर्जा खात्याने राज्याच्या ई-वाहन धोरणांतर्गत महावितरणला प्रमुख समन्वयक संस्था म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. नागपूरसह प्रमुख शहरांमध्ये प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने ई-वाहनांचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार, चार्जिंग केंद्रांना प्राधान्याने वीजजोडणी देण्याबरोबरच खासगी क्षेत्रालाही या उपक्रमात सहभागी करून घेतले जात आहे.

चार्जिंग स्टेशनची सुलभ प्रक्रिया…

जिल्ह्यातील चार्जिंग केंद्रांचे वितरण विविध भागांत संतुलित ठेवण्यात आले आहे. नागपूर शहर मंडळात महाल, काँग्रेस नगर, सिव्हिल लाईन्स, बुटीबोरी आणि गांधीबाग या भागांत सुविधा उपलब्ध आहेत, तर ग्रामीण मंडळात मौदा, सावनेर, काटोल आणि उमरेड येथेही केंद्रे कार्यरत आहेत. चार्जिंग केंद्र उभारणीच्या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीलाही चालना देण्यात येत आहे. सुलभ अर्जप्रक्रिया आणि तांत्रिक मार्गदर्शनामुळे उद्योग, गृहनिर्माण संस्था तसेच वैयक्तिक स्तरावरही या क्षेत्रात संधी निर्माण झाल्याचा महावितरणचा दावा आहे.

मोबाईल ॲपद्वारे चार्जिंग स्टेशनचे स्थळ कळणार

वाहनचालकांना त्यांच्या जवळचे चार्जिंग स्टेशन कुठे आहे, हे शोधण्यासाठी आता वणवण करण्याची गरज नाही. महावितरणच्या ‘पॉवरअप ईव्ही’ या मोबाईल ॲपमुळे चालक नकाशावर आपल्या जवळचे स्टेशन शोधू शकतात, स्लॉट बुक करू शकतात आणि सुलभपणे चार्जिंग करू शकतात.

सर्वाधिक चार्जिंग स्टेशन महाल, काँग्रेसनगर विभागात

जिल्ह्यातील ३०७ चार्जिंग स्टेशनपैकी महाल विभागात ८४, काँग्रेस नगर विभागात ६६, सिव्हिल लाईन्स विभागात ४५, बुटीबोरी विभागात ४० आणि गांधीबाग विभागातील १७, ग्रामीण मंडळातील मौदा विभागात २६, सावनेर विभागात १६, काटोल विभागात ७ आणि उमरेड विभागात ६ चार्जिंग स्टेशन्स कार्यरत आहेत.