नागपूर : नागपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलण्यात उड्डाणपुलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. २०१३ मध्ये शहरात अवघे १२ उड्डाणपूल आणि रेल्वे उड्डाणपूल अस्तित्वात होते. त्यानंतर वाढती वाहनसंख्या, शहराचा विस्तार, मेट्रो प्रकल्प तसेच राष्ट्रीय महामार्गांच्या जोडणीचा विचार करून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूल उभारण्यात आले. 

२०२५ पर्यंत ही संख्या ३५ हून अधिक झाली असून, आणखी सुमारे १५ उड्डाणपूल नियोजन, बांधकाम किंवा मंजुरीच्या टप्प्यात आहेत. म्हणजेच अवघ्या १२ वर्षांत नागपूरमधील उड्डाणपुलांच्या संख्येत सुमारे १९१ टक्क्यांची वाढ झाली आहे.  या माध्यमातून शहरातील प्रमुख चौकांवरील वाहतूक कोंडी कमी करणे, प्रवासाचा वेळ वाचविणे आणि शहरातील विविध भागांतील संपर्क अधिक गतिमान करणे शक्य झाले आहे. 

केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार असलेल्या नितीन गडकरी यांच्या या पूलांच्या निर्मितीत महत्वपूर्ण योगदान आहे. मात्र आता गडकरी यांनी स्वत: नागपुरात पूल भरपूर झाले असल्याचे मत व्यक्त करत आणखी मागणी नको असा थेट सल्ला दिला.  

उड्डाणपुलांमुळे समस्यांमध्ये वाढ  

शहरातील वर्धा रोड, अमरावती रोड, कामठी रोड, मानेवाडा, अजनी, इंदोरा-दिघोरी, पारडी, मानकापूर, जरीपटका यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवरील उड्डाणपुलांमुळे वाहतुकीची क्षमता वाढली असून, नागपूरची ओळख नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उभारणाऱ्या देशातील आघाडीच्या शहरांपैकी एक म्हणून अधिक ठळक झाली आहे. मात्र दुसरीकडे नियोजनाचा अभाव, पुलांच्या संरचनेतील त्रुटी यामुळे शहरातील उड्डाणपूले समाधानाऐवजी समस्याच अधिक ठरत आहेत. मागील एका दशकात शहरातील उड्डापूलांची संख्या तीनपट झाली असली तरी वाहतूक खोळंबा कमी होण्याऐवजी वाढला असल्याचे चित्र आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर उड्डाणपूलांचे काम सुरू आहेत. मात्र या पूलांच्या उद्घाटनापूर्वीच यांच्या संरचनेतील त्रुटी स्पष्टपणे दिसून पडतात. 

काय म्हणाले गडकरी? 

शहरात आता पुष्कळ पूल झाले आहेत, की मलाही आणखी पूल आता नको वाटत आहे. मात्र आता लोकांच्या इतक्या अपेक्षा वाढल्या आहेत की पूर्वी एक पूलही होत नव्हता, आता प्रत्येक भागात पूल होत आहे. आता जो तो म्हणतो माझ्या घरासमोर पूल बांधा, कारण आता लोकांना वाटते की हे होऊ शकते, असे मत व्यक्त करत आता पुलांची मागणी करू नका असा सल्ला गडकरींनी यावेळी दिला. समृद्धी महामार्गाचे श्रेय मला दिले जाते, मात्र याचे खरे श्रेय फडणवीस यांचेच आहे, असेही ते म्हणाले.