नागपूर : अनेक नगरसेवक निवडून आल्यानंतर प्रभागात नागरिकांना दिसत नाही. यावरून नागरिकांच्या नगरसेवक दिसत नसल्याच्या तक्रारी नागपुरातील नेत्यांना नवीन नाही. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी अशा तक्रारी करणाऱ्या नागरिकांचे यापूर्वीही कान टोचले. आता पुन्हा संधी मिळताच ‘नगरसेवक तुमच्या बापाचे नोकर नाहीत’, अशा शब्दात पुन्हा नागरिकांचे कान टोचले.

नगरसेवक हे काही पाळीव प्राणी नाहीत. ते तुम्हाला दिसलेच पाहिजे. याचा अर्थ नगरसेवकाने कामच करू नये, असा होत नाही. नगरसेवक म्हणून निवडून आला असाल तर नगरसेवकांनी कामे केलीच पाहिजे. लोकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या पाहिजे. त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजे. मात्र नगरसेवक रोज दिसलाच पाहिजे हा कोणाचा हट्ट असेल तर तो योग्य नाही अशी पुस्ती गडकरी यांनी जोडली.

नागपूर महापालिकेच्या अमृत महोत्सवी स्थापना दिनानिमित्त महापालिकेतर्फे मुख्यालयाच्या हिरवळीवर माजी महापौर, माजी उपमहापौर यांचा सॊमवारी सत्कार करण्यात आला. त्यावेळी केंद्रीयमंत्री गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, सत्तापक्ष नेते बाल्या बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, आमदार संदीप जोशी यांच्यासह मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. उपस्थित होते.

यावेळी माजी महापौर सर्वश्री कुंदा विजयकर, दयाशंकर तिवारी, वसुंधरा मासुरकर, पांडुरंग हिवरकर, अर्चना डेहनकर, प्रा. अनिल सोले, नंदा जिचकार, राजेश तांबे, किशोर डोरले यांच्यासह माजी उपमहापौरांचा केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी महापालिकेत नगरसेवक म्हणून काम न केल्याची खंत व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, नगरसेवक होणे सर्वात कठीण काम आहे. आमदार, खासदार, मंत्री होणे कधीही परवडते, परंतु नगरसेवकांमागे सकाळपासून नागरिक लागले असतात. दररोज सकाळी नगरसेवक दिसावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. नगरसेवकांकडे निधी नसते, निधी मिळाला तर अधिकारी फिरवतात, अशी स्थिती असते, असे ते म्हणाले

कर वाढवायचा असेल तर आधी थकीत वसुल करा

महापालिकेचा इतिहास गौरवशाली आहे. महापालिकेच्या ७५ व्या वर्षात ७५ मैदान तयार करावे. काही कामे करण्यासाठी पैसा लागत नाही. नव्या स्थायी समिती अध्यक्षा अर्थसंकल्प तयार करतील, त्यावेळी मीही काही सूचना करणार आहे. सध्या मालमत्ता कर वाढवू नये, परंतु वाढवायचा असेल तर आधी थकबाकीदारांकडून वसूल करा, अशा सूचना त्यांनी महापालिका अधिकारी तसेच नवनिर्वाचित महापौर, स्थायी समिती सभापती यांना दिल्या. कर वाढल्यास प्रामाणिक लोकांवर भुर्दंड बसतो, जे भरत नाही, ते नामानिराळे राहातात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

लता मंगेशकर यांचा ‘तो’ किस्सा सांगितला गडकरी यांनी!

नागपुरात दिवंगत लता मंगेशकर यांच्या एका कार्यक्रमात गोंधळ झाला होता. त्यानंतर त्यांनी नागपुरात कधीही कुठल्याही कार्यक्रमाला न येण्याचा निर्धार केला होता. तत्कालीन महापौर कुंदा विजयकर व माजी महापौर अटलबहादूर सिंग यांनी महापालिकेतर्फे लता मंगेशकर यांचा गौरव करण्याचे ठरवले. परंतु लता मंगेशकर नागपुरात येणार का, हा प्रश्न होता. मी १९९६ मध्ये युती सरकारमध्ये मंत्री असल्याने लता मंगेशकर यांना नागपुरात आणण्याची जबाबदारी दोघांनी माझ्यावर सोपवली. मी लता मंगेशकर यांनी नागपुरात यावा म्हणून पाठपुरावा सुरू केला. परंतु लता मंगेशकर हा आणि ना, काहीच म्हणत नव्हत्या. मी त्यांना खूप विनंती केली. अखेर त्यांनी होकार दिला, असे गडकरी यांनी सांगितले.

नागपुरात १९५१ मधील दगडफेकीच्या कटू घटनेनंतर लता मंगेशकर यांनी ४५ वर्षांहून अधिक काळ नागपुरात कार्यक्रम करणे टाळले होते. तत्कालीन महापौर कुंदा विजयकर व माजी महापौर अटलबहादूर सिंग यांनी त्यांना नागपुरात आणण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. अखेर लता मंगेशकर आल्या. १९ नोव्हेंबर रोजी १९९६ रोजी महापालिकेतर्फे सिव्हिल लाईन येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर लता मंगेशकर यांचा सत्कार करण्यात आला, अशी आठवण केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितली. महापालिकेत अनेक वाद-विवाद होतात. परंतु कधीही कटुता आली नाही. माजी महापौर अटलबहादूर सिंग विरोधक होते. परंतु त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते, असे गडकरी यांनी सांगितले.