नागपूर : रस्ते सुरक्षेसंदर्भात एका कार्यक्रमात माझ्यासह अमिताभ बच्चन, विकी कौशल व आलिया भट यांनी एका कार्यक्रमात भाग घेतला होता. या कार्यक्रमात एका आईने तिच्या मुलाचा अपघातात कसा मृत्यू झाला याबाबत हुंदके देत सांगितले. त्या महिलेचे हुंदके व मुलाला गमावल्याचा दु:ख बघता आलिया भटच्या डोळ्यात अश्रू आले. यावेळी याच कार्यक्रमात असलेल्या अमिताभ बच्चन यांनी आलियाही आई होणार असल्याने काळजीतून डोळ्यात अश्रू आल्याचे नमुद केले, असा किस्सा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी नागपुरात सांगितला.
शुक्रवारी ‘जनआक्रोश-फॉर बेटर टुमारो’ या सामाजिक संस्थेच्या चौदाव्या वर्धापन दिनानिमित्त उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर नीता ठाकरे, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, ‘जनआक्रोश’चे रवींद्र कासखेडीकर आदी उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षयकुमार, विकी कौशलचे कौतुक केले.
अमिताभ बच्चन, अक्षयकुमार यांनी रस्ते सुरक्षेबाबत नि:शुल्क जनजागृती केली. अमिताभ यांचा अपघात झाला. त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र त्यांनी दिवसभर रस्ते सुरक्षेसंबंधी जाहिरातीचे चित्रीकरण केले. त्यांना समाजाबाबत आपुलकी आहे. त्यांना अपघातामुळे काय होऊ शकते, याची जाणीव आहे. विकी कौशलने रस्ते सुरक्षेच्या जनजागृतीसाठी पुढे येण्याची तयारी दाखवल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी नगरसेवकांना मार्गदर्शन करताना रस्ते सुरक्षिततेबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. जनआक्रोशने गेल्या १४ वर्षात लोकांना रस्ता सुरक्षेचे धडे दिले. आता मुलांना धडे देण्यासाठी ट्रॅफिक पार्कमध्ये जागा देण्यात आली. मी खासदार निधीतून ५० लाख दिले, आणखी ५० लाख देणार आहे. तुमच्या भागातील शाळेचे विद्यार्थी येथे घेऊन या, त्यांना ने-आण करण्यासाठी, त्यांच्या नाश्त्यासाठी प्रायोजक शोधा. विविध संस्थांच्या सहकार्याने मुलांना येथे आणून रस्ते सुरक्षेबाबत प्रशिक्षित करा, अशा सूचना त्यांनी नगरसेवकांना केल्या. प्रभागात प्रत्येक ठिकाणी गतिरोधक लावण्याऐवजी रात्रीच्या वेळी चकाकणाऱ्या पेंटचा वापर करावा. अपघातप्रवण स्थळ शोधून आमदाराला सांगा, मला सांगा, जनआक्रोशला सहयोग करण्यासाठी पुढे येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
नगरसेवकांनी रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करावी. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकते. माझ्या प्रभागात एकही व्यक्ती अपघाताने मरणार नाही, असा संकल्प करावा. अपघात होणाऱ्या ठिकाणांबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवावा आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी त्यात लक्ष घालावे, असा सल्ला त्यांनी दिला. नगरसेवकांनी यावेळी प्रश्न उपस्थित केले. एका नगरसेविकेने त्यांच्या प्रभागातील अपघाताचा किस्सा सांगितला. प्रभागातील नागरिक नगरसेवकांना दोष देतात, असे सांगितले. यावर त्यांनी प्रभागातील अपघातप्रवण स्थळाचा शोध घेण्यासाठी महापौर नीता ठाकरे यांना एक समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या.
सत्काराला नकार
यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सत्कारासाठी जनआक्रोशचे पदाधिकारी पुढे आले असता त्यांनी त्याला नकार दिला. आम्ही तुमचा सत्कार केला पाहिजे, असे सांगत आता शेवटचा एकदाच सत्कार करा, असे गडकरी मिश्कीलपणे म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
अनेक मुख्यमंत्रीच सीटबेल्ट लावत नाहीत
मी अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत दौरे करताना ते सीटबेल्ट लावत नसल्याचे बघितले. मी या मुख्यमंत्र्यांच्या चालकाला हटकले. ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच उल्लंघन करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
