नागपूर : ‘एका तरुणाने स्टार्टअप सुरू करून पाण्याच्या बाटल्यांपासून जॅकेट तयार केले. त्याने एक जॅकेट मला आणि दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिले. अत्यंत सुंदर असे ते जॅकेट होते,’ असे सांगत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नवउद्योग आणि संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले.
नागपुरातील रास्ता नॅशनल लेव्हल स्टार्टअप ॲन्ड इनोव्हेशन चॅलेंजमध्ये पुरस्कार समारंभात गडकरी बोलत होते. समारंभातील पुरस्कार मिळवलेल्या तरुणांना शुभेच्छा देताना गडकरी यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’, जैवइंधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, संशोधन आणि नवतंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश बदलू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.
स्टार्टअप आणि संशोधनाबाबत नितीन गडकरी काय म्हणाले?
गडकरी म्हणाले, ‘भविष्यात कोणता देश संशोधनात पुढे राहतो, यालाच महत्त्व असेल. संशोधनामुळे मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत. एकेकाळी युद्धात रणगाडे आणि सैन्य वापरले जात होते. आता ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर होत आहे. अनेकदा शत्रू दिसतही नाही. या बदलामागे ज्ञान आणि संशोधन हीच मोठी ताकद आहे.’ ‘भारताला भविष्यात विश्वगुरू व्हायचे असेल आणि पहिल्या क्रमांकावर पोहोचायचे असेल, तर त्याचा थेट संबंध संशोधनाशी आहे,’ असेही त्यांनी नमूद केले.
‘वेस्ट टू वेल्थ’बाबत गडकरींनी कोणती उदाहरणे दिली?
‘कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्याच्या प्रश्नावर अनेक संशोधन गरजेचे आहे. नागपुरात १२ वर्षांपूर्वी नाल्याचे सांडपाणी विकण्याची कल्पना मांडली होती. आता शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून जैवइंधन तयार करण्याचे काम सुरू केले. ‘घनकचऱ्याचे वर्गीकरण करून तो बायोडायजेस्टरमध्ये टाकला, तर त्यातून ६० टक्के मिथेन मिळते. त्यापासून दररोज २८ टन जैव-सीएनजी तयार होऊ शकते. त्यावर शहरातील संपूर्ण बससेवा चालवता येईल,’ असे गडकरी म्हणाले.
प्लास्टिकपासून इंधननिर्मितीबाबत गडकरी काय म्हणाले?
‘शहरातील प्लास्टिकपासून मी स्वतः तेल तयार करतो. माझा स्वतःचा प्रकल्प आहे. त्यातून दररोज पाच हजार लिटर भट्टी तेल तयार होते. इंडियन ऑईल हे तेल ५० रुपये लिटरने विकते, तर मी ते ३८ रुपये लिटरने देतो. त्यातून मला महिन्याला २० ते २५ लाख रुपये मिळतात,’ अशी माहिती गडकरी यांनी दिली.
रासायनिक खतांच्या पर्यायाबाबत त्यांनी काय सांगितले?
‘आपल्या अभियंत्यांनी संशोधनातून शहरातील सांडपाणी आणि दुग्ध प्रकल्पातील सांडपाण्यापासून सेंद्रिय डीएपी खत तयार करण्याचे काम सुरू केले आहे.’ ‘रासायनिक खतांच्या आयातीवर देशाला दरवर्षी सात ते आठ लाख कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्याला पर्याय शोधला, तर देशाचा मोठा पैसा वाचू शकतो,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते आणि पूल बांधकामातील नवतंत्रज्ञानाबाबत गडकरी काय म्हणाले?
‘रस्ते क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान आले आहे. दोन उड्डाणपुलांमधील खांबांचे अंतर पूर्वी ३० मीटर असायचे. रेशीमबाग चौकात ते १०० मीटरपर्यंत नेण्यात आले असून ते १२० मीटरपर्यंतही नेता येऊ शकते,’ असे गडकरी म्हणाले. ‘पुण्यात ५० हजार कोटी रुपयांचे पूल बांधकाम सुरू आहे. चार मजली पूल उभारले जात आहेत. त्याच्या चौथ्या स्तरावर मेट्रो धावणार आहे. या पुलांमध्ये स्टील फायबर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.
स्वतःच्या आयुष्याबाबत गडकरींनी कोणता अनुभव सांगितला?
गडकरी म्हणाले, ‘अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी मी अपात्र ठरलो होतो. मला ४९ टक्के गुण होते, तर नियम ५० टक्क्यांचा होता. आज माझ्या नावावर सात जागतिक विक्रम आणि १८ डिलिट पदव्या आहेत. मात्र मी स्वतःला विद्वान समजत नाही; मी जुगाडू आहे.’ ‘धाडस केले, तरच विक्रम घडतात. अनेक लोक आयुष्यभर नोकरी, व्यवसाय आणि कर्ज याचाच विचार करत राहतात. पण जुगाडू माणसे थेट निर्णय घेतात,’ असेही त्यांनी नमूद केले.
