अकोला : राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्याकडून भूसंपादन कमी दरात केल्याप्रकरणी वाशीम जिल्हा न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा पथकर नाका जप्तीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात जप्तीची प्रक्रिया करून पथकर नाक्यावर न्यायालयाचा ‘वॉरंट’ चिटकवण्यात आला. दवंडीद्वारे पथकर नाका जप्तीची कारवाई केल्याचे जप्ती अधिकारी जितेंद्र नेमाने यांनी शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान, प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रीय महामार्ग क. १६१ वर बेबीताई दिनकर गर्जे व त्यांचा मुलगा विठ्ठल दिनकर गर्जे यांची मौजे जांभरूण नावजी येथील राज्य महामार्ग ५१ वाशीम ते रिसोड लगत असलेले गट नं. ५५, ५६, ५७ मध्ये जमीन होती. ही जमीन अकृषक करण्यात आली होती. या जमिनीचे भूसंपादन केले. तत्कालीन भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी यांनी अधिकृत केलेल्या प्लॉटचाच मोबदला दिला. भूसंपादनामध्ये लेआउटमधील रस्ते, खुली जागा व सुखसोयीसाठी सोडलेल्या जागेची नुकसान भरपाई दिली नाही. नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी लवाद अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दावा दाखल केला. वाढीव भाव व भूसंपादन केलेल्या रस्ते, खुली जागा व सुखसोयीच्या जमिनीची नव्या भावाने नुकसान भरपाईचे आदेश लवादाने दिले. राष्टीय महामार्ग प्राधिकरणाने आदेशाप्रमाणे रक्कम दिली नाही.
न्यायालयाच्या आदेशाने मोठी खळबळ
शेतकऱ्यांनी वाशीम जिल्हा न्यायालयात धाव घेऊन वसुलीसाठी ६ दरखास्ती दाखल केल्या. तोंडगाव धुमका पथकर नाक्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दररोज दोन ते तीन लाखाची रक्कम वाहनधारकांकडून वसूल केली जाते. तो जप्त करण्याची मागणी केली. ही मागणी वाशीमचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांनी मान्य करून ०७ जुलै रोजी तोंडगाव-धूमका पथकर नाका जप्त करण्याचे वॉरंट काढले.
जप्तीची प्रक्रिया
आदेशाची अंमलबजावणी करत आज तोंडगाव पथकर नाका जप्तीची कारवाई करण्यात आली. नाक्यावर ‘वॉरंट’ नोटीस चिटकवण्यात आली. दवंडी देऊन हा पथकर नाका जप्त केल्याचे जाहीर केले. मालमत्ता न्यायालयाच्या ताब्यात असल्याची घोषणा करून कोणीही या पथकर नाक्यासंदर्भात व्यवहार करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.
२.८० कोटींची नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना दोन कोटी ८० लाख ९३ हजार ५२२ रुपयांची नुकसान भरपाई न दिल्याने तोंडगाव येथील पथकर नाका जप्तीची कारवाई केली आहे. या प्रकरणात आता २० जुलैला न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, प्राधिकरणाच्या वकिलांनी संपर्क साधून नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवल्याचे शेतकऱ्यांचे वकील ॲड. उदय देशमुख यांनी सांगितले.
