नागपूर : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाची लोकप्रियता चांगलीच वाढली आहे. आज सर्वत्र त्या कार्यक्रमाची चर्चा असते तसेच या कार्यक्रमामध्ये असलेले कलाकारही नेहमी चर्चेत असतात. आज अनेक चित्रपटांमधूनही हास्यजत्रेमधील कलाकार समोर यायला लागले आहेत.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या कार्यक्रमातील कलाकारांविषयी महत्त्वाचे विधान केले आहे. राजर्षी शाहू महाराज जयंती व सामाजिक न्याय दिनाच्या निमित्ताने विवेक विचार मंच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि सहयोगी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषद आयोजित करण्यात आले होती. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, कोणतीही व्यक्ती जात-पात, धर्माने मोठी नसते, तर तिच्या गुणांनी मोठी होत असते. आपल्याला समाजातील आर्थिक, सामाजिक विषमता दूर करून जातीने नव्हे तर गुणांनी मोठा असलेला समाज निर्माण करायचा आहे. सरन्यायाधीश भूषण गवई हे दलित समाजातील असूनही इतक्या मोठ्या पदावर गेले. प्रत्येकामध्ये क्षमता आहे. त्या क्षमतेच्या आधारावर व्यक्ती मोठा व्हावा हेच बाबासाहेबांचे स्वप्न होते, असेही गडकरी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आज दलित समाजातील अनेक लोक कला क्षेत्रात पुढे आहेत. महाराष्ट्राची हास्यजत्र या कार्यक्रमातील अनेक कलाकार हे दलित समाजातील आहेत. मात्र, आज ते लोकांच्या मनावर राज्य करतात. तसेच राम-लक्ष्मण या संगितकारांनी अनेक चित्रपटांना गाणी दिली आहेत. ते नागपूरचे आहेत. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाली आहेत. त्यांचा आदर्श घेऊन आपणही समोर जावे असेही गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित समाजासाठी जीवन समर्पित केले. सामाजिक न्यायाच्या आधारावर हा समाज सुखी झाला पाहिजे, असे बाबासाहेब म्हणायचे. त्यांच्या संघर्षाचा काळ लक्षात घेतला तर त्यावेळी उपासमारी, गरिबी, अत्याचार, अन्याय मोठ्या प्रमाणात होते. अश्या परिस्थितीत त्यांनी दलित, शोषित, पीडित समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. गडकरी म्हणाले, ‘आपण संत, महापुरुषांची जात नव्हे, त्यांचे काम बघतो. अनेक डॉक्टर, वकील दलीत समाजातील आहेत. आपण त्यांच्याकडे जाताना जात बघत नाही. कार्य, कर्तृत्व आणि नेतृत्व हे गुणांमुळे आकाराला येत असते.
सामाजिक न्याय, आर्थिक समता प्रस्थापित व्हावी हे बाबासाहेबांना अपेक्षित होते. त्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करावे लागेल. भाषणातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीच्या जोरावर समाजासाठी काम करावे लागेल असेही गडकरी म्हणाले.