नागपूर : नितीन गडकरी हे भारतीय राजकारणातील एक वेगळे, ठाम आणि कार्यकेंद्री व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. संघटनकौशल्य, स्पष्टवक्तेपणा आणि निर्णयक्षमता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. विचारसरणीत ठाम असले तरी कामाच्या बाबतीत ते व्यावहारिक दृष्टिकोन ठेवतात. पायाभूत सुविधांच्या विकासाला त्यांनी दिलेले प्राधान्य, विशेषतः रस्ते, महामार्ग आणि वाहतूक क्षेत्रातील बदल, यामुळे ते ‘काम करणारे नेते’ म्हणून ओळख निर्माण करतात.
राजकीय मतभेद असले तरी संवादाचे दरवाजे बंद न ठेवणारा, सर्वपक्षीय संपर्क जपणारा नेता अशीही त्यांची प्रतिमा आहे. वैयक्तिक जीवनात साधेपणा, स्पष्ट बोलणे आणि कामातून उत्तर देण्याची शैली हे गुण त्यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाला अधिक विश्वासार्ह बनवतात. मागील वर्षातील डिसेंबर महिन्यात गडकरींनी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. आता जानेवारीमध्ये त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशीही त्यांनी भेट घेतली. या भेटीबाबत चर्चा सुरू आहे.
नितीन गडकरी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांची भेट चर्चेला विषय ठरली होती. संसदच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये संसद भवनात ही भेट झाली. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात प्रियंका गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातील रस्ते प्रकल्पांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मागितला.
गडकरी यांनी तात्काळ होकार देत आपल्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. या भेटीत वायनाडमधील राष्ट्रीय महामार्ग, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रलंबित प्रकल्पांबाबत चर्चा झाली. गडकरी यांनी काही रस्ते राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले, मात्र केंद्राच्या अधिकारातील प्रकल्पांबाबत आवश्यक ती दखल घेण्याचे आश्वासन दिले. भेटीदरम्यान कोणत्याही प्रकारची राजकीय चर्चा, युतीविषयक संकेत किंवा आरोप-प्रत्यारोप झाले नसल्याचे दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आले होते. आता राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे मुद्दे काय होते, याबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे.
नेमके काय घडले?
संसद भवन परिसरात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची झालेली भेट झाली. याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये संसद भवन परिसरात दोन्ही नेते एकमेकांसमोर येताना स्पष्ट दिसतात. राहुल गांधी पुढे येत नितीन गडकरी यांना अभिवादन करतात, त्यानंतर दोघांमध्ये हस्तांदोलन होते. काही क्षण तेथेच थांबून दोघे परस्परांशी संवाद साधताना दिसतात.
या दरम्यान आजूबाजूला उपस्थित असलेले इतर खासदार आणि कर्मचारीही व्हिडिओत दिसून येतात. संपूर्ण भेट ही अल्पकालीन असून कोणतेही औपचारिक भाषण किंवा जाहीर विधान या व्हिडिओत दिसत नाही. संसद भवनाच्या नियमित कामकाजादरम्यान घडलेली ही भेट असल्याचे व्हिडिओवरून स्पष्ट होते. या भेटीचे कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा भेटीमागील कारण अद्याप समोर आलेले नाही.

