नागपूर : भाजपमधील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज असल्याचे सांगताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ज्या डॉ. राजीव पोतदारांचा उल्लेख ‘घर की मुर्गी दाल बराबर’ असा केला होता, त्यांनाच अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षातील जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत केलेली सार्वजनिक कार्यक्रमात केलेली सूचना अखेर प्रत्यक्षात उतरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. राजीव पोतदार यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करून गडकरी यांच्या सूचनेचा मान दिल्याचे मानले जात आहे.

गडकरींची सूचक टिप्पणी चर्चेत

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित असताना त्यांनी थेट नाव घेऊन डॉ. राजीव पोतदार यांच्या कार्याचा उल्लेख केला. चांगला माणूस हा ‘घर की मुर्गी दाल बराबर’ असते, तर बाहेरून आलेले ‘सावजी चिकन मसाला’ ठरतात, अशी मिश्कील पण मार्मिक टिप्पणी करत त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

राजीव पोतदारांच्या कार्याचा गौरव

कळमेश्वर-सावनेर परिसरात भाजपच्या संघटनात्मक कामासाठी डॉ. पोतदार यांनी दीर्घकाळ योगदान दिल्याचे गडकरी यांनी अधोरेखित केले. दवाखान्याकडे लक्ष द्या, असे मी त्यांना अनेकदा सांगितले; मात्र त्यांनी स्वतःचा व्यवसाय बाजूला ठेवून जनतेची कामे करण्याला प्राधान्य दिले, असे सांगत त्यांनी पोतदार यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. प्रामाणिकपणे जनसेवा करणे हीच भाजपची शिकवण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

‘इनकमिंग’बाबत गडकरींचा इशारा

राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी पक्ष नेतृत्वाला सूचक इशारा दिला. जुन्या कार्यकर्त्यांची कदर केली नाही, तर पक्ष ज्या वेगाने वर गेला आहे, त्याच वेगाने खालीही येऊ शकतो, असे ते म्हणाले. नव्याने पक्षात येणाऱ्यांचे स्वागत करताना अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उमेदवारीने कार्यकर्त्यांना दिलासा

गडकरी यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. अखेर विधान परिषदेसाठी डॉ. राजीव पोतदार यांच्या नावाची घोषणा झाल्याने त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संघटनात्मक पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षनिष्ठा, सातत्यपूर्ण काम आणि जनसंपर्क यांना योग्य सन्मान मिळू शकतो, असा संदेश या निर्णयातून गेला असल्याची प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.