नागपूर : विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. यासंदर्भात गडकरी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या निवदेनात गडकरी म्हणतात, फडणवीस यांच्या विरोधात गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काहीतरी सांगितले, असे  वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णत: निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे. फडणवीस माझ्यासाठी धाकटय़ा भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. एकमेकांच्या विरोधात लावालावी करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार यांनी आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात.

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्षनेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशाप्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप गडकरी यांनी केला आहे.

महाज्योतीत वडेट्टीवार यांचा मनमानी कारभार – पडळकर

आमदार गोपीचंद पडळकर यांनी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर महाज्योतीच्या काराभावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. वडेट्टीवार हे ओबीसी व भटक्या, विमुक्त विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी निर्माण झालेल्या महाज्योती संस्थेला आपली जहागिरी समजून मनमानी कारभार करत आहेत, अशी टीका गुरुवारी प्रसिद्धीपत्रकातून केली.लोकसत्ताने बुधवारच्या अंकात महाज्योतीच्या विद्यावेतनासाठी विद्यार्थी आक्रमक या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या विषयाला अनुसरून पडळकर यांनी ही तोफ डागली. ते म्हणाले, महाज्योती संस्थेचा बट्टय़ाबोळ व हसे या प्रस्थापितांच्या सरकारने करून ठेवले आहे. ‘‘बडय़ा बडय़ा बाता आणि ‘धोरण’ खातंय लाथा ’’ अशी वडेट्टीवरांची गत झाली आहे. ओबीसी, भटक्या विमुक्तांचा पुळका आल्याचे दाखवायचे आणि पुन्हा त्यांच्याच गळ्यावर सुरा चालवायचा हे वडेट्टीवार साहेबांचे धोरण राहिले, आहे अशी टीका भाजप नेते पडळकर यांनी केली आहे. एमपीएससी आणि यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योतीने परीक्षा घेतली, यातील पात्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देणे क्रमप्राप्त असताना यास महाज्योती संस्था स्पष्टपणे नकार देत आहे. मात्र दुसरीकडे सारथी संस्था व बार्टी संस्था आपल्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व विद्यावेतन देत आहे. सारथी आणि बार्टीकडून विद्यार्थ्यांना प्रतिमहिना १० ते २५ हजार निधी मिळतो. महाज्योती मात्र विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे, असेही पडळकर म्हणाले.