नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य नेहमीच अनेकांना बुचकळ्यात टाकणारे असते. अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून त्यांच्या निवृत्तीचे संकेत निघतात. रविवारी त्यांनी खासदार औद्योगिक महोत्सवानिमित्त ॲडव्हॉंटेज विदर्भच्या पत्रकार परिषदेत माहिती देताना उद्योग क्षेत्रात नवीन पिढी आता पुढे येत आहे. नव्या पिढीने आम्हाला निवृत्त करायला हवे, असे नमुद केले. त्यानंतर भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करणारे भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून आमदार संदीप जोशी यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. याशिवाय त्यांच्या काही समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी राजीनामा दिलेले आहे. गडकरींचे वक्तव्य आणि या राजीनामांचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुख्यमंत्री व माझ्यामुळे विदर्भासाठी सुवर्णकाळ
मी केंद्रात मंत्री आहे तर देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री. त्यामुळे विदर्भासाठी हा सुवर्णकाळ असून प्रत्येक समस्या सोडविल्या जात आहे. आता भांडवली उद्योगावर भर दिला जात आहे. यातून रोजगार वाढणार असून विदर्भाचा विकास होईल, असे ते म्हणाले. अमरावतीत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर तेथे वस्त्रोद्योग फोफावला. केवळ नागपूरच नव्हे तर केंद्र व राज्य सरकार मिळून विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात विकासाचे नियोजन करण्यात येत असल्याचे गडकरींनी नमुद केले.
भाजपमध्ये अस्वस्थता वाढत आहे का ?
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. सध्याच्या राजकीय संस्कृती, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. १३ मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. जोशी हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे आणि जवळचे मित्र आहेत. असे असतानाही त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी का दिली ही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचे जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु, गडकरींनी नवीन नेतृत्वाला संधी देण्याचे घोषणा करण्याच्या दुसऱ्या दिवशी संदीप जोशी यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्या पत्रामध्ये त्यांनी मी ५५ वर्षाचा झालो असून नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढत असल्याने सर्व नेते अशाप्रकारे भूमिका मांडत आहेत का अशीही चर्चा आहे.
संदीप जोशी पत्रात काय म्हणाले होते?
मी आता ५५ वर्षांचा झालो आहे. स्वतःची जागा रिक्त करणं आणि तरुण रक्ताला समोर जाऊ देणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे माझ्या पुढील राजकीय वाटचालीला मी पूर्ण विचारांती पूर्णविराम देत आहे. पक्षाने मला मोठे केले याची मला जाणीव आहे. त्यामुळे या पक्षाचे शीर्षस्थ नेतृत्व नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माफी मागून मी आज हा निर्णय जाहीर करीत आहे.
