नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत माझा हस्तक्षेप असल्याच्या किंवा सहभाग असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रकाशित होत आहेत. त्यात तथ्य नाही. उलट राजकारण्यांनी, व्यावसायिकांनी किंवा साहित्य क्षेत्राच्या बाहेरील मंडळींनी कधीही साहित्य संस्थांमध्ये हस्तक्षेप करू नये, असे मी नेहमी म्हणत असतो. त्यामुळे मी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे.

मी विदर्भ साहित्य संघाचा हितचिंतक आहे. शंभर वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या संस्थेच्या कल्याणाचाच विचार मी करीत आलो आहे. आजची वर्तमान वास्तू पाडून त्याठिकाणी साहित्यिक व नाट्य चळवळीसाठी सोयीची अशी उत्कृष्ट वास्तू उभी व्हावी, असे माझे व्यक्तिगत मत आहे आणि ते यापूर्वी देखील होते. याठिकाणी साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील उपक्रमच आयोजित व्हावे. नवसाहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे आणि जुन्या जाणत्यांचा सन्मान व्हावा, हाच माझा विचार आहे आणि एवढीच माझी या संस्थेच्या संदर्भात अपेक्षा असल्याचे गडकरी म्हणाले.

विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची व कार्यकारीणीची निवडणूक ही त्या संस्थेशी संबंधित एक प्रक्रिया आहे. आजपर्यंत या निवडणुकीशी कधीही माझा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नव्हता आणि आजही नाही. त्यामध्ये माझा सहभाग असण्याचेही काहीच कारण नाही. उलट निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी ज्या मंडळींनी उमेदवारी दाखल केली आहे अश्या सर्वच प्रकारच्या परस्पर विरोधी व्यक्तींसोबत माझे उत्तम व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांनी एकत्र बसून, निवडणूक न होऊ देता, सर्वानुमते अध्यक्ष निवडण्याचा प्रयत्न करावा. विदर्भाच्या साहित्य क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी पोषक ठरेल, असे वातावरण तयार करू शकणारी कार्यकारीणीही सर्वानुमतेच निवडावी, असे मला मनापासून वाटते. विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्षाच्या निमित्ताने ही एक आदर्श बाब ठरेल, असे सांगून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भ साहित्य संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गडकरींचे पत्र

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूकीवरुन गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये सातत्याने नितीन गडकरी यांच्या हस्तक्षेपाच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. दरम्यान, आता गडकरी यांनीच ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाद भालचंद्र जोशी यांना पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी साहित्य क्षेत्राबाहेरील मंडळी, राजकारणी, व्यावसायिकांनी या संस्थेत कधीही हस्तक्षेप करू नये या मताचा मी आहे. त्यामुळे मी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हटले आहे.