नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नेहमीच कार्यकर्त्यांसोबत निवडणुकीत इच्छुकांचे आपल्या भाषणातून कान टोचले. अनेकदा त्यांनी नगरसेवकांनाही चिमटे काढले. रविवारीही त्यांनी एका कार्यक्रमात समाजासाठी योगदानावरून उमेदवारी मागणाऱ्यांना टोला लगावला.

उमेदवारी मागणाऱ्यांनी माझा ‘हा’ समज दूर केला

चर्मकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य, नागपूरतर्फे गुणवंत विद्यार्थी, नामवंतांचा सत्कार व समाजाचा मेळावा महाल येथील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, भैय्याजी बिघाणे उपस्थित होते. त्यावेळी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, अनेकांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली. अनेकांनी आमच्या समाजातील लोकांना उमेदवारी द्या, नगरसेवक बनवा, असे सांगितले. परंतु जेवढ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली, त्यांनी आपल्या जातीचे कल्याण केल्याचे उदाहरण दिसत नाही. एकदा उमेदवारी मिळाली की पुढे ते बायको, मुलगा, मुलीला उमेदवारी द्या, असे सांगतात. काहीतर स्वीय सहायकालाही उमेदवारीसाठी हट्ट धरतात. उमेदवारी दिली तर समाजाचे भले होईल, असा समज होता, त्याला गेल्या ४० – ४५ वर्षांत तडा गेला, असे गडकरी म्हणाले. समाजाबद्दल तळमळ असलेला नेता मिळणे, हीच समाजाची ताकद आहे. जमिनीवर राहून काम केले पाहिजे. मला काय देता, असे म्हणणारे नको. निवडणुकीत आमच्या मागे चर्मकार समाज होता. या समाजासोबत आमचे एक नाते आहे. त्यामुळे समाजासाठी उत्तम काम करण्याची आमची जबाबदारी आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने जेवढ्या गतीने नेता येईल, तेवढे आम्ही करणार, असे त्यांनी सांगितले. समाजात शिवणकाम, नक्षी काम करणारे असेल, त्यांनी उत्तम काम केले पाहिजे. भविष्यात कला आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले. नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा बनले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

धापेवाड्यात टेक्सटाईल मिलचे उद्घाटन १६ ऑक्टोबरला

चिंध्यापासून गालिचे तयार करण्याचे काम धापेवाड्यात होते. महिलांना रोजगार मिळाला. तेथे टसरच्या साड्याही तयार होते. आता तर पुरवठा करण्यासाठी साड्या कमी पडतात. पुढील महिन्यात १६ तारखेला उद्घाटन आहे. अभिनेत्री हेमामालिनी येणार आहेत. त्यांनी सांगितलेल्या डिझाईननुसार साडी तयार केली आणि त्यांना पाठवली. ती साडी घालून त्या येणार आहे, असे गडकरी यांनी नमुद केले. कुठल्याही समाजाची प्रगती भाषणाने, सरकारच्या प्रयत्नाने होणार नाही. समाजाने प्रगती व विकासाची चळवळ चालवली पाहिजे. समाजामध्ये प्रगतीचा पहिला कार्यक्रम म्हणजे समाजाचा शैक्षणिक विकास होय. समाजातील मुलांनी उत्तम शिक्षण घेतले पाहिजे. डॉक्टर, वकील, अभियंते, अशी एक पिढी तयार केली तर समाजाच्या प्रगतीला गती मिळाल्याशिवाय राहणार नाही. मुलांना गरीबीमुळे किंवा इतर कारणामुळे आई वडील शिक्षण देऊ शकत नाही. पण आई-वडिलांनी संकल्प करावा की मुलाला शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. केवळ इंजिनिअर, डॉक्टर, पत्रकार, वकील होणे म्हणजे शिक्षण नाही. ज्ञान आवश्यक आहे. ज्ञान वेगवेगळ्या प्रकारचे आहे. मुलींना नर्सिंग, चामड्याच्या वस्तु तयार करणे, वाहन चालविण्याचे ज्ञानही आवश्यक आहे. ज्ञानाचा संबंध कौशल्याशी आहे. म्हणून शिक्षण रोजगारभिमुख असले पाहिजे, असे त्यांनी नमुद केले.