नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (१२ जून ) रोजी १००% इथेनॉल इंधन नियमांवर स्वाक्षरी केली. याबाबत त्यांनीच शनिवारी नागपुरात माहिती दिली. मारुती, हिरो, टोयोटा कंपन्यांनी फ्लेक्स-फ्यूएल वाहने बाजारातही आणली असून आणखी कंपन्या १०० टक्के इथेनॉलवर धावणारी वाहने आणत आहे. केंद्रीयमंत्र्यांच्या या निर्णयामुळे देशाच्या पेट्रोलियम आयातीचे २५० अब्ज डॉलरची बचत होणार आहे.

मारुती सुझुकी वॅगनआर १०० टक्के इथेनॉलवर

नागपुरात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अनेक कंपन्या लवकरच दुचाकींसह १०० टक्के इथेनॉलवर चालणारी वाहनांची निर्मिती करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी मारुती सुझुकी वॅगनआर १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्यूएल मॉडेलमध्ये तयार करण्यात आल्याची माहिती दिली.

पुढील दोन वर्षांत सर्वच वाहने इथेनॉलवरील

केंद्रीयमंत्री गडकरी यांनी पुढील दोन वर्षांमध्ये सर्वच वाहने इथेनॉलवर धावतील, असे सांगितले. मारुती सुझुकीने इथेनॉलवरील कार, काही कंपन्यांनी दुचाकीही बाजारात आणली. आता इतर कंपन्याही त्यांच्या कार तयार करीत आहेत. येत्या तीन महिन्यांत नागपुरात पाण्यावर चालणारी बसचा प्रयोग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमुद केले. आज देशात ८७ टक्के गॅस व इतर पेट्रोलियम पदार्थ आयात केले जाते. त्यामुळे पेट्रोलियम पदार्थावर आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर

१२ वर्षाच्या कार्यकाळात भारताच्या संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण स्थित्यंतर झाले आहे. त्यामुळे भारत शस्त्रास्त्रांचा आयातदार देश न राहता एक प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार देश बनला आहे. देशाला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन भव्य संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर स्थापन करण्यात आले आहेत. येथे स्वदेशी शस्त्रास्त्रांचे उत्पादन केले जात आहे. भारताची किमान ६५% संरक्षण उपकरणे आता स्वदेशी बनावटीची आहेत. आपल्या संरक्षण निर्यातीने ३८,४०० कोटी रुपयांचा ऐतिहासिक आकडा ओलांडला आहे. आज, जगभरातील १०० हून अधिक देश भारताची स्वदेशी शस्त्रे खरेदी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्ते निर्मितीतून रोजगाराच्याही संधी

वाहतूक क्षेत्र बळकट करण्यासाठी केवळ रस्तेच तयार केले नाही तर या क्षेत्रातून रोजगाराच्याही संधी निर्माण केल्या, असा दावा गडकरी यांनी केला. २०१४ मध्ये देशात एकूण ९१,२८७ किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग होते. आज हे जाळे १.४६ लाख किलोमीटरहून अधिक आहे. मोदी सरकारने अगदी दुर्गम भागांपर्यंतही विकासाचा प्रवाह पोहोचवला आहे. २०१४ मध्ये केवळ ५ शहरांमध्ये २४८ किमीचे मेट्रो ट्रेनचे जाळे होते. आज भारतात २६ हून अधिक शहरांमध्ये १ हजार १०० किमी पेक्षा जास्त लांबीचे मेट्रो जाळे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षांत देशात केवळ ७४ विमानतळ होते. गेल्या १२ वर्षात मोदी सरकारने ९० हून अधिक नवीन विमानतळ बांधून एकूण संख्या १६४ वर आणली आहे, असे ते म्हणाले.

भारतीय संस्कृतीचा वारसा जपला

गरीब कल्याणाचा कार्यक्रम धडाक्यात राबवणाऱ्या मोदी सरकारने नवभारताच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. दहशतवादाचा बिमोड करून सामर्थ्यशाली भारताची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर राम मंदिर निर्मिती, काशी विश्वनाथ कॉरिडॉर, महाकाल कॉरिडॉर यासारख्या निर्णयातून गौरवशाली भारतीय संस्कृतीचा वारसा अभिमानाने जपला आहे. मोदी सरकारची १२ वर्षे विकास, विश्वास आणि जनकल्याणातून विकसित भारताची पायाभरणी करणारे ठरली आहेत, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

पक्षावर जनतेचा विश्वास

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी जनतेचा आमच्या पक्षावर विश्वास आहे, त्यामुळे देशाचा आणखी विकास होईल, असेही नमुद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात ५ ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे व देश महासत्ता होण्याकडे पुढे जात आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वात भविष्यातही देशाच्या विकासाचा संकल्प केला आहे. २०१४ पर्यंत जेवढा विकास झाला नव्हता, त्यापेक्षा अधिक विकास मागील १२ वर्षांत झाल्याचे त्यांनी नमुद केले. मागील १२ वर्षे हा कार्यकाळ विकासाचा इतिहास असून या काळातील निर्णयामुळे २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकार होईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी १२ वर्षांतील मोदी सरकारच्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा आढावा घेतला.