वर्धा : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे बोल नेहमीच चर्चेत असतात. बेधडक बोलतात त्याची पण गंमतीत चर्चा होते. पण रागावून गडकरी कोणास बोलले व ते जाहीरपणे लोकांत पाहिल्या गेले अशी बाब विरळच. कारण सर्वांसमक्ष असे रागावणे ते टाळतात, असे म्हटल्या जाते. पण या घटनेत गडकरी जे बोलले ते पाहून गडकरी यांना एवढा संताप का आला, असाच प्रश्न पडावा.

सिंदी येथील घटना

दोन दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे एक कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट या सरकारी उपक्रमातर्फे एका खाजगी कंपनीसोबत करार झाला असून त्या अंतर्गत सिंदीत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस व अन्य मान्यवार उपस्थित होते. याच वेळी एका महामार्गच्या कामाबाबत खूप तक्रारी झाल्याची माहिती गडकरी यांच्या कानी पडली.

झाप झाप झापले

सदर काम करणाऱ्या कंत्राटदारास यावेळी बोलावण्यात आले. त्यास गडकरी यांनी सर्वसमक्ष जाब विचारणे सूरू केले. ते म्हणाले की, किती घाणेरडे काम केले. शरम वाटली पाहिजे, फुकटचे पैसे पाहिजे का? यापुढे अर्ज करायचा नाही. या प्रकरणी दिल्लीत गेल्यावर चौकशी करणार. याद राख, असे खडे बोल गडकरी यांनी सुनावले व परत चौकशी करण्याची तंबी पण दिली. गडकरी यांचा असा पारा चढलेला पाहून सर्व गपगार झाले होते.

लॉजिस्टिक पार्क महत्वाचा..

उदघाटन वेळी बोलतांना गडकरी यांनी सिंदीत होणाऱ्या या प्रकल्पची भरभरून प्रशंसा केली. ते म्हणाले की या पार्कमुळे विदर्भातील कापूस, रुई, कपडा, संत्री आता मुंबईस नं जाता कोलकत्यामार्गे थेट बांगला देशात जाणार. वाहतूक खर्च कमी होणार. या सोबतच ईथे कोल्ड स्टोरेज, वेअर हाऊस सुविधा निर्माण होतील. जे निर्यातदार आहेत त्यांचे क्लस्टर तयार केल्या जाईल. कस्टम कार्यालय पण होणार. विदर्भातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार, अशी हमी पण गडकरी यांनी दिली.