नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार असून काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावरून विरोधकांनी जोरदार टीकेची झोड उठवली आहे. या टीकेचे कारण म्हणजे पंतप्रधान मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलडी चॉकलेट्सचा पुडा गिफ्ट दिला आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राहूल गांधी यांचा समाचार घेतला आहे. त्यांच्या या टीकेतून गोंधळलेली मानसिकता दिसते असाही आरोप केला.
राहुल गांधी यांची टीका काय?
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले की, “देश आर्थिक संकटात आहे आणि आपले पंतप्रधान इटलीमध्ये चॉकलेट्स वाटत आहेत. एकीकडे शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यावसायिक आक्रोश करत आहेत. मात्र, दुसरीकडे पंतप्रधान मोदी हे हासत आहेत आणि रिल्स बनवत आहेत, त्यावर भाजपा टाळ्या वाजवत आहे. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काय म्हणाले गडकरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य अत्यंत लज्जास्पद आणि दुर्दैवी आहे. त्यातून त्यांची गोंधळलेली मानसिकता दिसून येते. राजकारणात वैचारिक मतभेद असणे स्वाभाविक आहे, परंतु लोकशाहीतील घटनात्मक पदांवर असलेल्या नेत्यांनी अशी भाषा आणि शब्द वापरणे अत्यंत निंदनीय आहे. हा देशवासीयांच्या भावनांचा अपमान आहे. देशातील जनतेने काँग्रेस पक्षाच्या या द्वेषपूर्ण राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे आणि यापुढेही देत राहील, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून टीका केली आहे.
रायबरेलीमधील वक्तव्यावरूनही टीका
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे देशात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रायबरेली येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपा देखील आक्रमक झाली आहे. “पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि आरएसएस गद्दार आहेत, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगा”, असे आवाहन राहुल गांधींनी रायबरेलीत कार्यकर्त्यांना केले. राहुल गांधींची भाषा पाकिस्तान आणि दहशतवाद्यांसारखी असल्याची टीका भाजपाने केली आहे.
