नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा टीकचेही धनी होतात. परंतु कार्यक्रमातून स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव बदलत नाही. शेतकऱ्यांसाठी आयोजित एका परिषदेत त्यांनी नेहमी नेहमी एकच गोष्ट सांगतो, आता कंटाळा आला असे नमुद करीत खंत व्यक्त केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना विविध उदाहरणे देत शेतीत प्रयोग करून बघण्याचा सल्लाही दिला.
ज्यांना गरज असेल त्यांना शिकवणार
हॉटेल सेंटर पॉईंट येथे शनिवारी बायोचार निर्मितीवर शेतकऱ्यांसाठी विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले. यात केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतीसाठी उत्तम बी, उत्तम कलमांसह त्यापूर्वी जमिनीचे परीक्षण करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. जमिनीची स्थिती काय आहे, पोषक द्रव्ये किती आहे, याबाबत माहिती घेऊन अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले. महापालिककडे कचऱ्यातून वर्गीकरण करून बायोसीएनजी तयार करतो. याशिवाय यातून खत तयार होते. परंतु ते खत कुणी घेत नाही.
लोकांना सांगून सांगून आता कंटाळा आला. ऐकायचे असेल तर ऐका नाहीतर खड्ड्यात जा, असे नमुद करीत त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते फुकटात खातात अन जातात. आम्ही भाषण देत असतो, कुणी ऐकतात, नाहीतर चालले जातात. हे असे भाडोत्री लोक नको. ज्या शेतकऱ्यांना गरज असेल त्यांना शिकवू, तयार करणार, असे नमुद करीत त्यांनी जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढविण्यासाठी आवश्यक ते करण्याचा सल्ला दिला.
प्रयोग म्हणजे गाजरांची पुंगी, वाजली तर ठिक नाही तर खाऊन घ्यायची
माणसाला जशी ऑक्सिजनची गरज आहे. जमिनीलाही त्याचप्रकारे सेंद्रिय कार्बनची गरज आहे. सेंद्रिय कार्बन जमिनीत वाढविण्यासाठी मी आधी प्रयोग करतो. माझ्या शेतात ०.३ सेंद्रीय कार्बन होते. ते वाढविण्यासाठी मी प्रयत्न केले. आता ८८ टन उस होतो. नागपूर महापालिकेच्या कचऱ्यातून सध्या २८ टन बायोसीएनजी दर दिवशी तयार होतो. शहरातील २८ हजार वाहने चालू शकते. याशिवाय यातून खत तयार होते. सध्या देशात ४ हजार प्रकल्प तयार होत आहे. पण लोक फुकटात भेटते म्हणते म्हणून वापरत नाही.
रासायनिक खतामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढते आहे. त्यातून समाजाला वाचविण्याची जबाबदारी आपली आहे. जे प्रयोग करता येईल, ते करा, शेवटी त्या गाजरांच्या पुंग्या आहे, वाजल्या तर ठिक नाहीतर खाऊन टाका. यशाची खात्री नाही, तुम्ही ठरवा शेतात बायोचार वापरायचे की रासायनिक खत वापरायचे आहे. पण सेंद्रिय खत वापरल्याशिवाय शेतकऱ्यांची प्रगती नाही, असे ते म्हणाले. शेतकऱ्याने व्हॅल्यू अडिशन केल्यास डॉलर्समध्ये पैसे मिळू शकते. जास्तीत जास्त पैसा मिळवायला नवीन गोष्टी शिकणे, प्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
आता लोक मारबत, बडग्या काढतात
एकेकाळी नागपूर हातमागावरील वस्त्र तयार करण्यात आघाडीवर होते. त्यानंतर सर्व संपले. विणकरही संपले होते. आता मारबत, बडग्या काढतात आणि सावजीचे मटन तयार करतात. पुन्हा हातमाग जिवंत करण्याबाबत मी ठरवले. धापेवाडा येथे आता मी टसर सिल्कच्या साड्या तयार करतो. आता पुढच्या महिन्यात उद्घाटन करतो आहे, त्यासाठी अभिनेत्री हेमामालिनी येणार असल्याचे त्यांनी गडकरी म्हणाले.
