नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा आपल्या भाषणातून चाहत्यांना कधी सुखद तर कधी आश्चर्याचा धक्का दिला. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्या भाषणाकडे नेहमीच लक्ष असते. किंबहुना कान देऊन गडकरी यांना ऐकले जाते. आज, शनिवारीही त्यांनी एका कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखच्या उपस्थितीत नव्या तरुणांच्या गळ्यात जबाबदारीची माळ घातली पाहिजे, असे सांगितले. आता आपलं वय झालं. उर्वरित आयुष्य सामाजिक कार्यात घालावं, अशी इच्छा आहे. या कामात खूप आनंद आहे. पण मागे अनेक जबाबदाऱ्या आहेत, अशी खंत गडकरी यांनी व्यक्त केली.

दीड महिन्यापूर्वी ऍडव्हान्टेज विदर्भच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातून निवृत्तीबाबत मोठे विधान केले होते. जुन्या पिढीने हळूहळू निवृत्त होऊन नवीन पिढीकडे जबाबदारी सोपवली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त होते. ‘नव्या पिढीने आम्हाला निवृत्त करायला हवे’ आणि ‘व्यवस्था सुरळीत सुरू झाल्यावर आपण दुसरे काम करू’ असे दीड महिन्यापूर्वी ते म्हणाले होते. आज शनिवारी त्यांनी पुन्हा एकदा लक्ष वेधले. नागपुरात खापरी मिहान येथे ‘एकल हब’ या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक एकात्मिक उपक्रमाला गडकरी यांच्या हस्ते सुरुवात झाली. व्यासपीठावर अभिनेते रितेश देशमुख होते.

गडकरी पुढे म्हणाले, लक्ष्मण मानकर ट्रस्टद्वारे अनेक सामाजिक उपक्रम सुरु आहे. गडचिरोली जिल्ह्यात शाळा सुरु केल्या. एक काळ होता, या भागात कुणी जाऊ शकत नव्हते. आज येथील स्थिती बदलत आहे. ही एक मोठी प्रक्रिया आहे. गडचिरोलीसह वाशीम जिल्ह्यात एकल हब प्रकल्प सुरु करावा, असा सल्ला त्यांनी यावेळी ट्रस्टच्या पदाधिकारी व तरुण नेतृत्वाला दिला. गडचिरोलीत दहा वर्षांपूर्वी मीठ नव्हते, लोक लाल मुंग्याचा मिठाचा पर्याय म्हणून वापर करत होते. लक्ष्मण मानकर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आपले संवेदनशील मन दाखवले. स्वतः पैसाही खर्च करीत आहे. आज अनेकांचे खिसे पैशाने तुडुंब भरले आहे. पण खिशातून एक रुपया काढत नाही. चहा सुद्धा लोकांच्या पैशाने पिणारे कौडीचुंबक लोक आहेत. मात्र ट्रस्टच्या तरुण नेतृत्वाने, अतुल यांनी पैशाची चिंता केली नाही. जो सर्वांसाठी देतो, देव त्याला खूप देतो, म्हणून आता तरुण नेतृत्वाच्या गळ्यात जबाबदारीची माळ घातली पाहिजे, असे ते म्हणाले.

मी अतुल यांना नेहमी या भानगडीत पडू नको असे सांगत होतो. पण त्याने ऐकले नाही. दलित, शोषित, पीडित मागासलेल्या वर्गाचा विकास झाला पाहिजे, असा विचार करणारे संवेदनशील मन अनेक आहेत. पण पुढाकार घेणे महत्वाचे आहे. आपला डोमेस्टिक हॅपी इंडेक्स अर्थात सुखांक चांगला आहे. पण ज्यांच्याकडे सुविधा नाही, त्यांच्या जीवनात बदल कसा करता येईल, य हेतूने लक्ष्मण मानकर ट्रस्ट काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.